जळगाव : जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात वसलेले वनकोठे हे गाव एकेकाळी वसंत सहकारी साखर कारखान्यामुळे नावाजले होते. मात्र, ओडिशातून चोरट्या मार्गाने आणलेला गांजा राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणाऱ्या तस्करांमुळे सध्या या गावाकडे वेगळ्या हेतूने पाहिले जात आहे. पोलिसांनी अलीकडेच १९ किलो गांजाची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्यानंतर वनकोठे पुन्हा एकदा चर्चेत आले.

एरंडोलहून कासोदाकडे जाताना लागणाऱ्या वनकोठे गावास सहकारी तत्वावर उभारण्यात आलेल्या वसंत साखर कारखान्यामुळे विशेष नावलौकीक काही वर्षांपूर्वी प्राप्त झाला होता. हंगामावर कारखाना सुरू असेपर्यंत वनकोठे अगदी गजबजून जायचे. आर्थिक उलाढाल वाढल्याने परिसरातील कासोदा, आडगाव, फरकांडे, बांभोरी आदी गावांमध्येही चैतन्य ओसंडून वाहत असे. मात्र, १९९९ मध्ये साखर कारखाना बंद पडला आणि वनकोठे परिसराची रयाच गेली. ऊस उत्पादक कापसासह अन्य पिकांकडे वळले. हातचा रोजगार गेल्याने तब्बल ८०० कामगारांना नाशिक, मुंबई, पुण्याची वाट धरावी लागली. याच स्थितीचा फायदा घेत बेरोजगार झालेल्या गावोगावच्या तरूणांना गांजा तस्करीच्या जाळ्यात ओढण्याचे काम काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी केले. किंबहुना तेव्हापासून वनकोठे गाव गांजा तस्करीचे राज्यातील एक केंद्र बनले.

ओडिशा ते वनकोठे थेट संबंध

एरवी जळगाव जिल्ह्यात सातपुडा पर्वतालगतच्या चोपडा तालुक्यात गांजाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, स्थानिक गांजापेक्षा कितीतरी पटीने जास्त भाव ओडिशा राज्यातून महाराष्ट्रात चोरट्या मार्गाने आलेल्या दर्जेदार गांजाला मिळतो. गांजाची नशा करणारे देखील ओडिशातील गांजासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्यास तयार असतात. एरंडोल तालुक्यातील वनकोठे व परिसरात वास्तव्यास असलेले तस्कर त्यामुळे थेट ओडिशातून गांजा मागवण्यास प्राधान्य देतात. नंतर त्याची मागणीनुसार बंदिस्ती करून नाशिक, मुंबई, पुणे मार्गे राज्याच्या इतर भागात विल्हेवाट लावतात. याच प्रयत्नातून ओडिशा राज्यात जाऊन गांजाची गाडी भरून आणणाऱ्या वनकोठे गावच्या पोलीस पाटलास २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती.

चार वर्षांपासून त्यास जामीन मिळालेला नाही. दुसरीकडे, वनकोठे गाव गांजा तस्करीमुळे संपूर्ण राज्यात प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतरही पोलीस यंत्रणेला तस्करीत गुंतलेल्या याठिकाणच्या मोठ्या गुन्हेगारांची पाळेमुळे खोदून काढण्यात अद्याप म्हणावे तसे यश आलेले नाही. ओडिशातून आलेला गांजा इतर राज्यांच्या सीमा ओलांडून जळगाव जिल्ह्यातील वनकोठे सारख्या लहान गावात पोहोचतो तरी कसा, असा प्रश्न त्यामुळे स्थानिकांना पडला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कासोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहिल्यांदा गांजा तस्कराच्या विरोधात मंगळवारी मोठी कारवाई झाली. चार महिन्यांपासून त्यांच्यावर लक्ष ठेवून होतो. यापुढेही कारवाईत सातत्य ठेवून तरूण पिढीला त्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करणार आहे. नीलेश राजपूत (सहायक पोलीस निरीक्षक, कासोदा, जि.जळगाव)