नाशिक – शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत असताना महानगरपालिकेच्या सिटीलिंक शहर बससेवेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पाससाठी ऑफलाईन प्रक्रियेत बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांच्या कागदपत्रांचा गैरवापर होऊ नये म्हणून ऑफलाईन पद्धतीने पास घेण्यासाठी ही नवी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
नाशिक महानगर परिवहन महामंडळ अर्थात सिटीलिंकच्या वतीने शहरातंर्गत आणि शहर हद्दीपासून २० किलोमीटरपर्यंत बससेवा देण्यात येते. हजारो नाशिककर या बसेवेचा लाभ घेतात. नियमित बस प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सवलतीच्या दरात प्रवास करता यावा, यासाठी सिटीलिंक विविध प्रकारचे पास उपलब्ध करून देते. प्रवासी हे पास ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोनही पद्धतीने काढू शकतात. आता ऑफलाईन पद्धतीने पास काढण्याकरिता नवीन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या प्रक्रियेत आता प्रवाशांना “नाशिक सिटी बस” या सिटीलिंक ॲप्लिकेशनमध्ये ‘अप्लाय ऑफलाईन पास’ हा नवीन पर्याय उपलब्ध करून दिला गेला. नाशिक सिटी बस ॲप अद्ययावत केल्यास ॲपच्या पडद्यावर हा पर्याय दिसेल. त्या माध्यमातून आपण संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपणास साकेतांक क्रमांक प्राप्त होईल. हा सांकेतांक आणि जोडलेल्या कागदपत्रांची मूळ प्रत सिटीलिंकच्या कोणत्याही अधिकृत पास केंद्रावर दाखवून पासची रक्कम जमा केल्यास प्रवाशांना तत्काळ पास उपलब्ध करण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे ही प्रक्रिया एकदाच म्हणजे नवीन पास काढण्यासाठी करावी लागणार आहे. ती केल्यानंतर पास नुतनीकरणावेळी पासधारक थेट केंद्रावर जाऊन नुतनीकरण करू शकतात. ऑफलाईन पद्धतीने पास काढणाऱ्या प्रवाशांनी या नवीन प्रक्रियेनुसारच पास काढावा. यावेळी काही अडचण आल्यास ८५३०० ५७२२२ /८५३००६७२२२ या मदतवाहिनीवर संपर्क साधावा.
पास असा काढता येईल…
नाशिक सिटी बस या ॲपमध्ये जाऊन ‘अप्लाय ऑफलाईन पास’ या पर्यायावर क्लिक करावे. नंतर पासधारकाचे पूर्ण नाव, संपर्क क्रमांक, ई मेल, आधार क्रमांक अशी आवश्यक माहिती भरावी. पासचा प्रकार निवडून आवश्यक दस्तावेज अपलोड करावेत. यात विद्यार्थी पाससाठी छायाचित्र, सत्य प्रमाणपत्र (बोनाफाईड) / सिटीलिंक अर्ज, आधारकार्ड. तर लहान मुलांच्या पाससाठी छायाचित्र, बोनाफाईड /सिटीलिंक अर्ज, आधारकार्ड. खुल्या गटातील आणि निश्चित मार्ग पाससाठी छायाचित्र व आधारकार्ड अपलोड करावे लागेल. ही प्रक्रिया केल्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करावे. यानंतर कार्यालयाकडून वापरकर्त्याच्या भ्रमणध्वनीवर साकेतांक संदेशासह पाठविला जाईल. हा क्रमांक व अपलोड केलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रत सिटीलिंकच्या कोणत्याही अधिकृत केंद्रावर दाखवून व पासची रक्कम जमा करून तत्काळ पास उपलब्ध करून दिला जाईल.