स्वर्गीय आण्णासाहेब पाटील यांची २५ सप्टेंबर रोजी ८६ वी जयंती असून माथाडी कायद्याला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त एपीएमसीत माथाडी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. युतीबाबतचा तिढा अद्याप सुटला नसल्याने या कार्यक्रमात ते काय बोलतात याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.या शिवाय मुंबई वडार समाज संघाच्या वडार भवनासही ते एकत्रित भेट देणार आहेत.

आण्णासाहेब आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत माथाडी मेळाव्याबाबत  माहिती दिली. या वेळी त्यांनी माथाडी कामगारांच्या चळवळीत बाहेरील वाईट प्रवृत्तीने शिरकाव केल्याने चळवळ बदनाम होत आहे. याला आळा घलू असे सांगितले. माथाडी कायदा, माथाडी युनियन व माथाडी पतपेढीला ५० वर्षे पूर्ण होत असल्याने या वर्षी हा मेळावा हा भव्यदिव्य साजरा होणार असल्याचेही सांगितले. मेळाव्यास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे ,रवींद्र चव्हाण, माजी मंत्री गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, संदीप नाईक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विजय चौगुले यांनीही पत्रकार परिषदा घेत वडार भवनाला दोन्ही मान्यवर भेट देणार असून समाजातील होतकरू मुलांना मान्यवरांच्या हस्ते मदत व सत्कार केला जाणार असल्याचे सांगितले.

नरेंद्र पाटील यांनी सातारा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने विधानसभेनंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीत आपल्यालाच तिकीट मिळणार असल्याचा दावा केला आहे. तर चौगुले यांनी युती न झाल्यास पक्षाने आदेश दिल्यास ऐरोली मतदारसंघातून शिवसेनेकडून रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे बुधवारी मुख्यमंत्री व उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.