खारघरमधील रहिवाशांचा सवाल; परिसरातील तलावांची डबकी

खारघरमधील कोपरा गाव आणि बेलपाडा येथील तलावांना डबक्यांचे स्वरूप आल्याने गणेशभक्तांना विसर्जनासाठी बेलापूर येथील आग्रोळी तलावाकडे जावे लागत आहे. घराजवळ तलाव असूनही केवळ सोयीसुविधा नसल्यामुळे विसर्जनासाठी दूर जावे लागत असल्यामुळे रहिवाशांत नाराजी आहे.

गेल्या वर्षी कोपरा व बेलपाडा येथील दोन तलावांवर गणेश विसर्जनाची सोय करण्यात आली होती. तर यंदा से. १४मध्ये देखील विसर्जन घाट तयार करण्यात आला आहे. मात्र या तलावांना नियोजनाच्या अभावामुळे डबक्यांचे स्वरूप आल्याने गणेशभक्तांच्या आंनदावर विरजण पडत आहे. कोपरा गावातील तलाव मोठा असून येथे जवळपास ३ ते ४ हजार गणेश मूर्तीचे विसर्जन होऊ शकते. तर बेलपाडा गावातील तलावात एक ते दीड हजार मूर्तीचे विसर्जन केले जात होते. जाते. मात्र काही वर्षांमध्ये खारघरमधील लोकसंख्या लाखोंच्या घरात गेल्याने हे दोन्ही तलाव विसर्जनासाठी अपुरे पडत होते. म्हणून यंदा से.१४ येथील तलावाची निर्मिती केली आहे. मात्र त्या तलावाला डबक्यांचे स्वरूप आले असून संरक्षक भिंत नसल्याने अपघाताची देखील शक्यता आहे.