आशीष धनगर

कोणत्याही परिस्थितीत वेळेवर धावणारी लोकल सेवा म्हणून प्रवाशांच्या कौतुकाचा विषय असलेल्या ठाणे-वाशी, ठाणे-पनवेल या ट्रान्सहार्बर लोकल सेवेलाही आता विलंबाने पछाडले आहे. ठाणे ते ऐरोली या स्थानकांदरम्यान सुरू असलेल्या तांत्रिक कामांमुळे ट्रान्सहार्बरवरील लोकलगाडय़ांना वेगमर्यादा घालून देण्यात आली आहे. त्यामुळे दोन आठवडय़ांपासून या मार्गावरील सेवेची रखडपट्टी सुरू आहे. ठाणे ते वाशीदरम्यान लागणारा प्रवासाचा कालावधी ३५ मिनिटांवर गेला आहे.

नवी मुंबई आणि पनवेल शहराचे मोठय़ा प्रमाणात नागरीकरण झाले आहे. या दोन्ही शहरांची लोकसंख्या वाढल्याने २००४ साली मध्य रेल्वेने सिडकोच्या मदतीने ट्रान्सहार्बर लोकल सेवा सुरू केली. प्रशस्त रेल्वे स्थानके आणि वेळेवर धावणाऱ्या लोकल गाडय़ा अशी ट्रान्स हार्बर मार्गाची ओळख आहे. गेल्या काही वर्षांपासून या मार्गावर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची संख्या वाढल्याने या ठिकाणच्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. सकाळ आणि सायंकाळच्या वेळी ट्रान्सहार्बर मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. मात्र, अगदी पावसाळय़ातही ही लोकलसेवा वेळेवर सुरू असते; परंतु गेल्या काही दिवसांपासून या मार्गावरील लोकलचा वेग मंदावल्याचे दिसून येत आहे.

ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे ते ऐरोली स्थानकांदरम्यान रेल्वे प्रशासनाने तांत्रिक दुरुस्तीसाठी आणि अपघात होऊ नये यासाठी लोकल गाडय़ांना वेगर्निबध घातले आहेत. ठाणे ते ऐरोली स्थानकांदरम्यान दिघा येथे मोठे वळण आहे. या वळणावर दोन वेळा लोकलची चाके घसरून अपघात झाले. तसेच या ठिकाणी रुळाशेजारी राहणाऱ्या लोकांकडून मोठय़ा प्रमाणात कचराही टाकण्यात येतो. त्यामुळे या रुळांची देखभाल दुरुस्ती वेळोवेळी व्हावी. तसेच या ठिकाणी लोकल बिघाड आणि अपघात टळावेत त्यासाठी या वेगमर्यादा घालण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, या वेगमर्यादेमुळे ठाणे ते वाशी आणि ठाणे ते पनवेल स्थानकांदरम्यानच्या प्रवासाचा कालावधी सुमारे पाच ते सात मिनिटांनी वाढला आहे.

सेवा पूर्ववत कधी?

काही दिवसांपूर्वी ठाणे ते वाशी प्रवासासाठी २८ मिनिटांचा कालावधी लागत होता, तर ठाणे ते पनवेलदरम्यानच्या प्रवासासाठी ५२ मिनिटांचा कालावधी लागत होता. मात्र, ठाणे ते ऐरोली स्थानकांदरम्यान रेल्वे प्रशासनाने वेगमर्यादा घातल्याने प्रवाशाच्या कालावधीत सात मिनिटांची वाढ झाली आहे. सध्या ठाणे ते वाशी प्रवासासाठी ३६ मिनिटे, तर ठाणे ते पनवेलसाठी एक तासाचा कालावधी लागत आहे. तसेच या वेगमर्यादा कधी शिथिल करण्यात येणार आहेत याबाबत रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी अनिल कुमार जैन यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

काही दिवसांपासून ठाणे ते ऐरोली स्थानकांदरम्यान लोकल गाडी खूप कमी वेगात धावते. तसेच ठाण्याहून वाशीला जाण्यासाठी पाच ते सात मिनिटे जास्त वेळ लागतो. त्यामुळे कार्यालयात जाण्यासाठी घरून थोडे लवकर निघावे लागते.

– सुमेध मोहिते, प्रवासी