प्रारूप मतदार यादी जाहीर; हरकतींसाठी २३ फेब्रुवारीपर्यंत मुदत
नवी मुंबई : होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी प्रभागांनुसार प्रारूप मतदार यादी पालिका प्रशासनाने संकेतस्थळावर जाहीर केली. यात मतदारांची आदलाबदल झाल्याचा आरोप इच्छुकांसह विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या यादींवर पहिल्या दिवसापासून हरकती येण्यास सुरुवात झाली असून यासाठी २३ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला असून महापालिका प्रशासनाने मंगळवारी प्रारूप मतदार याद्या पालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर केल्या आहेत. १५ जानेवारी २०२१ पर्यंतची मतदार यादी या निवडणुकीसाठी ग्रा धरली जाणार असून बेलापूर मतदारसंघात २९,५७० तर ऐरोली मतदारसंघात ३४,२०१ मतदार असे एकूण ६३,७७१ नवीन मतदार वाढले आहेत. या वाढलेल्या मतदरांची विभागणी, प्रारूप मतदार यादी कशी असणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागून होते. त्यानुसार या प्रारूप याद्या प्राप्त होताच यादींची छाननी सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे.
प्रारूप मतदार याद्यांची माहिती घेण्यात येत असून काही नावे दुसऱ्या प्रभागात गेल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. याबाबत पालिकेकडे हरकत घेण्यात येणार असल्याचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी सांगितले. तर नेरुळ सेक्टर १६,१८ येथील नावे सीवूड्स विभागात आल्याचे दिसत असून याबाबत हरकत घेण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे विभागप्रमुख समीर बागवान यांनी सांगितले. वाशी प्रभाग ६२ मध्ये प्रभाग क्रमांक ६१ची नावे आली असल्याचे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजू शिंदे यांनी सांगितले. तर प्रारूप यांद्यांबाबात सखोल माहिती घेण्यात येत असून जर नावांमध्ये मोठा फेरफार आढळल्यास याबाबत हरकती व सूचना मांडण्यात येतील व वेळ पडल्यास न्यायालयातही जाण्याच्या इशारा भाजपने दिला आहे.
अनेक मतदारांचे नाव विविध विभागांत अदलीबदली झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पुढील दोन दिवसांत सर्व प्रारूप मतदार यांद्याबाबत सविस्तर माहिती घेऊन पालिका आयुक्तांकडे हरकती व सूचना मांडण्यात येणार आहेत. प्रथमदर्शनी काही याद्यांमध्ये मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात गेल्याचे दिसून येत आहे.
विजय नहाटा, उपनेते शिवसेना
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 17, 2021 12:17 am