News Flash

तिसऱ्या लाटेपूर्वी रुग्णशय्यांत दुप्पट वाढ

नवी मुंबई महापालिकेचे नियोजन; २५ हजारांपर्यंत रुग्णसंख्या जाण्याची शक्यता

नवी मुंबई महापालिकेचे नियोजन; २५ हजारांपर्यंत रुग्णसंख्या जाण्याची शक्यता

नवी मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य सुविधा अपुरी पडल्याने नवी मुंबई महापालिका प्रशासनाने तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून आतापासूनच तयारी सुरू केली आहे. या काळात उपचाराधीन रुग्णांची संख्या २५ हजारांपर्यंत गेली तरी १२ हजारांपेक्षा अधिक रुग्णांवर एकावेळी उपचार करता येतील, असे नियोजन करण्यात येत आहे.

ऑगस्ट ते सप्टेंबरच्या दरम्यान करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आरोग्यतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे. या संदर्भात पालिका आयुक्तांनी सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली असून सर्व शक्यतांनुसार आरोग्य सुविधा सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये उपचाराधीन रुग्णांची संख्या जास्तीत जास्त ३ हजार ६८८ तसेच दुसऱ्या लाटेत ही संख्या जास्तीत जास्त ११ हजार ६०५ पर्यंत गेली. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत उपचाराधीन रुग्णसंख्या तीन ते चार पटीने वाढली होती. याचा आंदाज कोणालाही नव्हता. त्यामुळे आरोग्य व्यवस्था अपुरी पडली होती. खाटा, प्राणवायू व जीवरक्षक प्रणाली अभावी अनेकांचा जीव गेला आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेची तयारी आतापासूनच करण्यात येत आहे.

तिसऱ्या लाटेत उपचाराधीन रुग्णांची संख्या साधारणत: २५ हजारपार होईल असा एक अंदाज बांधण्यात आला असून त्यापैकी ५० टक्के रुग्ण करोना काळजी केंद्र व रुग्णालयात दाखल होतील. म्हणजे  १२ हजार खाटांची तयारी पालिकेला करावी लागणार आहे. त्यात अतिदक्षता खाटांची संख्या १५०० पर्यंत करणे गरजेचे आहे.

सध्या ३००० प्राणवायू खाटा असून त्यामध्ये २००० खाटांची वाढ करण्यात येणार आहे. ५००० प्राणवायू व साध्या खाटांची संख्या वाढवण्याची तयारी करण्यात आली आहे. आरोग्य सुविधांत वाढ करताना यासाठी लागणारी जागाही तयार ठेवावी लागणार असून प्रत्यक्ष पाहणी करून  कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी अभियांत्रिकी व आरोग्य विभागाला दिले आहेत.

तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकेल असा एक अंदाज आहे. त्यादृष्टीने लहान मुलांसाठी सर्वसाधारण खाटा, प्राणवायू खाटा, अतिदक्षता खाटा यासह पीडियाट्रिक जीवरक्षक प्रणालीची व्यवस्था असलेली विशेष काळजी केंद्रे उभारण्याच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा करण्यात आली. लहान मुलांसाठी काळजी केंद्र उभारण्यात येणार असून मलांसोबत त्यांचे आई किंवा वडील काळजीवाहू म्हणून असतील हे लक्षात घेऊन त्यांच्यासाठीही व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नुकत्याच जन्मलेल्या बाळांसाठीही विशेष व्यवस्था करण्याविषयी नियोजन करण्यात येणार आहे. एकीकडे आरोग्यसुविधा वाढवताना मनुष्यबळ, प्रशिक्षण, औषध साठा करण्याचे निर्देश आयुक्तांनी या बैठकीत दिल आहेत.

या बैठकीला अतिरिक्त आयुक्त  संजय काकडे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, शहर अभियंता संजय देसाई, उपआयुक्त योगेश कडुस्कर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, परिवहन व्यवस्थापक शिरिष आरदवाड, परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी नीलेश नलावडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण उपस्थित होते.

प्राणवायू प्रकल्प उभारणार

दुसऱ्या लाटेमध्ये प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाला होता. हा अनुभव लक्षात घेता पालिकेतर्फे सिडको प्रदर्शनी केंद्रात प्राणवायू प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मे अखेपर्यंत  हा प्रकल्प कार्यान्वित होईल. या व्यतिरिक्त आणखी दोन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

पहिल्या व दुसऱ्या लाटेचा अनुभवन घेता तिसरी लाट मोठी असू शकते म्हणून खाटा, प्राणवायू याबाबत योग्य नियोजन केले असून भविष्यात या सर्व सुविधांचा तटवडा भासणार नाही. नेरुळ, ऐरोली व बेलापूर येथील नव्या इमारतींमध्ये जास्तीत जास्त सुविधा करण्यात येतील.

-अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका

उपलब्ध खाटा व वाढविण्यात येणाऱ्या खाटा

                           उपलब्ध            वाढ       एकूण खाटा

साध्या खाटा          ४०००              ४०००            ८०००

प्राणवायू खाटा       २२००             २०००            ४२००

जीवरक्षक प्रणाली :  ५५०                ७००             १३५०

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 1:27 am

Web Title: nmmc administration started preparations for possibility of corona third wave zws 70
Next Stories
1 ३२ केंद्रांवर लशींची दुसरी मात्रा
2 कडक निर्बधांना आता मुदतवाढ नको!
3 पनवेलमध्ये करोना मृत्यूंची चिंता कायम
Just Now!
X