नवी मुंबईतील गर्दीवर दक्षता पथकांची नजर

नवी मुंबई</strong> : करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने फटाके फोडण्यास मज्जाव केला असला, तरी नवी मुंबईत अद्याप अशा प्रकारचा कोणताही निर्णय झाला नाही. बंदी नसली तरी प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

करोनाचा आजार श्वसनाशी संबंधित असल्यामुळे अशा रुग्णांना फटाक्यांच्या प्रदूषणाचा त्रास होण्याचा दावा समाजमाध्यमांवर केला जात आहे. काही राजकीय पक्षांनी यंदाच्या दिवाळीत फटाके विक्री आणि वाजविण्यास बंदी घालण्याची मागणी काही दिवसांपूर्वी केली होती. तसेच राज्यभरातही अशाच प्रकारची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर राज्याच्या मंत्रिमंडळात याबाबत निर्णय होण्याची शक्यता होती. प्रत्यक्षात मात्र तसे झालेले नाही. करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने दिवाळीसंदर्भात नवी नियमावली तयार केली असून त्यात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी घातली आहे. तसेच केवळ लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फटाके फोडण्यास परवागनी देण्यात आली आहे. अशाच प्रकारचा निर्णय ठाणे जिल्ह्य़ातही होण्याची शक्यता वर्तविली जात होती, परंतु जिल्हा आणि पालिका प्रशासनाकडून अद्याप अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

यासंदर्भात नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांच्याशी संपर्क साधला असता, करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. करोना कमी झाला म्हणजे संपला असे नाही. त्यामुळे दिवाळीच्या सणासुदीमध्ये सामाजिक अंतराचे भान ठेवून नागरिकांनी नियम पाळले तरच आजची करोनाची स्थिती लवकर संपुष्टात आणण्यात यश येईल. त्यामुळे गर्दी टाळा असे आवाहन त्यांनी केले आहे. मुंबई पालिकेच्या फटाक्यांसदर्भात घेतलेल्या निर्णयाबाबत आंम्हीही विचार करीत आहोत. मात्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यास त्याप्रमाणे निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

नियम न पाळल्यास कारवाई

शहरात दिवाळी खरेदीसाठी नागरिक मोठय़ा प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. बाजारात होणाऱ्या गर्दीमुळे अधिक धोका संभवतो आहे. त्यामुळे पालिकेने नेमलेली दक्षता पथके या गर्दी नियंत्रणासाठी सक्रिय करण्यात आली आहेत. या पथकांद्वारे गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवले जाणार असून नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. आपल्यामुळे कुठेही गर्दी होणार नाही व आपण गर्दीत जाणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे व करोना नियमांचे पालनही काटेकोरपणे केले पाहिजे.

बारवर कारवाई

बेलापूर सेक्टर१५ येथील द बार स्टॉक एक्सेंज या रेस्टॉरंटमध्ये सामाजिक अंतराचा नियम पाळला जात नसल्याने पालिका प्रशासनाने त्यांच्यावर दंडातम्क करावाई केली आहे. १४ हजारांचा दंड वसूल केला आहे.

गर्दीची ठिकाणे

* वाशी सेक्टर १७, १०,९

* कोपरखैरणे डी मार्ट परिसर

* शिरवणे मार्केट,

* नेरुळ सेक्टर १०,११,१३

* एपीएमसी मार्केट

* बेलापूर सेक्टर १५,सेक्टर २

फटके विक्रेते चिंताग्रस्त स्टॉलबाबत निर्णय अधांतरी

नवी मुंबई : सरकारने फटाके विक्रीबाबत अगोदरच निर्णय जाहीर करायला हवा होता. अद्याप काहीच जाहीर केले नाहीत. त्यामुळे विक्रीसाठी स्टॉलला महापालिकेने परवानगी देण्यात न आल्याने विक्रेते नाराजी व्यक्त करीत आहेत. आधीच टाळेबंदीत आर्थिक संकट असताना यामुळे लाखोंचे नुकसान होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

नवी मुंबई शहरात बोनकोडे, वाशी या ठिकाणी फटाक्यांचे स्टॉल लागतात.  बाजारपेठा दिवाळी साहित्याने गजबजलेल्या आहेत. त्यामुळे फटाके विक्रीही करता येईल यासाठी विक्रेत्यांनी लाखोंचे फटाके घेऊन ठेवले आहेत. मात्र दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असताना विक्रीबाबत काहीच धोरण न ठरल्याने विक्रत्यांची निराशा झाली आहे.

शासनाने लवकर निर्णय जाहीर करून परवानगी द्यावी अशी मागणी फटाके विक्रेते अक्षय वंडेकर यांनी मागणी केली आहे.