नवी मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदार चोरीचा आरोप करीत जनआंदोलन सुरु केले. नवी मुंबईतील मतदारयादीत ७६ हजार दुबार नावे असल्याचा आरोप काँग्रेसनें केला आहे. ही नावे महापालिका निवडणुक पूर्वी वगळण्याची लेखी मागणी ठाणे जिल्हाधिकारी जिल्हा तथा जिल्हा मतदार नोंदणी अधिकारी, ठाणे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे. अशी माहिती आजच्या पत्रकार परिषदेत इंटक अध्यक्ष व प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी दिली आहे.
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात बेलापूर आणि ऐरोली या दोन विधानसभा मिळून सुमारे ७६ हजारांहून अधिक दुबार नावे आहेत. ऐरोली विधानसभा मतदारसंघात ४१ हजार ५५६ दुबार नावे आणि बेलापुर विधानसभा मतदारसंघात ३५ हजाराच्या आसपास दुबार नावे आहेत. यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे यातील अनेक नावे दोन्ही मतदार संघात असल्याने मनपा निवडणुकीत एक व्यक्तीं दोन ठिकाणी मतदान करेल अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
काही ठिकाणी तर एकाच नोडमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघातही तीच तीच नावे दोन ते तीन वेळा पहावयास मिळतात. नजरचुकीने म्हटल्यास शंभर-दोनशे, फारफार तर हजार पाचशे मतांचा गोंधळ होऊ शकतो. परंतु ७६ हजार मतांपेक्षा अधिक नावे म्हणजे नियोजित षडयंत्र आहे. असा आरोप नवी मुंबई काँग्रेसने केला आहे. यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना हाताशी धरून दबाव टाकून सत्ताधारी पक्षांनी हे कृत्य केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.
दोन वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातच नाही तर पालिकेच्या शेजारच्या मतदारसंघातही दुबार नावांचा घोळ आहे. ग्रामीण भागातील मतदारही येथील मतदार याद्यांमध्ये घुसविण्यात आले आहेत.
याबाबतचे सर्व पुरावे आपण जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. याप्रकरणी चौकशीचे निर्देश देवून तपास करणे आवश्यक आहे. कारण महापालिका निवडणूकीत या मतदानाचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर व प्रामाणिकपणावर संशय निर्माण झाला आहे. ही सर्वच्या सर्व दुबार मतदार नावे नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अगोदर तातडीने वगळण्यात यावीत आणि नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक पूर्वी ही प्रक्रिया पार पाडून सुधारित मतदार यादी जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली आहे. अशी माहिती रवींद्र सावंत यांनी दिली आहे.
नवी मुंबईतील ७६ हजाराहून अधिक दुबार नावे वगळण्याची मागणी करताना निवेदन सादर केले, त्यावेळी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते संतोष शेट्टी , अनवर हवलदार, विद्याताई भांडेकर, उत्तम पिसाळ, प्रल्हाद गायकवाड, संतोष सुतार, बाबासाहेब गायकवाड व इतर मान्यवर उपस्थित होते. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.