शुक्रवारीही ६३२ गाडय़ांची आवक; भाज्यांचे दर घसरलेलेच

तुर्भे येथील एपीएमसीच्या घाऊक बाजारात गुरुवारी मोठय़ा प्रमाणात आलेली भाजी आणि शुक्रवारी त्याची झालेली पुनरावृत्ती यामुळे वांगी, कोबी, शिमला मिरची व फरसबीसारख्या भाज्या काही व्यापाऱ्यांना उकिरडय़ावर फेकाव्या लागल्या. विशेष म्हणजे गुरुवारी झालेली विक्रमी आवक शुक्रवारीदेखील ६३२ गाडय़ांची झाली. मात्र गुरुवारी खरेदीदारांसाठी देव पाण्यात टाकून बसलेल्या व्यापाऱ्यांना शुक्रवारी चांगला उठाव मिळाला. भाज्यांचे दर मात्र गुरुवारइतकेच कमी राहिलेले आहेत.

अवकाळी पडणारा पाऊस त्यामुळे शेतमालाच्या होणाऱ्या नुकसानाची भीती आणि गुजरात, मध्य प्रदेश या शेजारील राज्यांतून येणारी स्वस्त भाजी यामुळे तुर्भे येथील भाज्यांची घाऊक बाजारात आवक गुरुवारी मोठय़ा प्रमाणात वाढली. संध्याकाळपर्यंत ७०० ट्रक टेम्पो भरून भाजी बाजारात आल्याची नोंद आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या एमएमआरडीए भागासाठी ६०० ट्रक भरून आलेली भाजी पुरेशी आहे. ती जास्त असल्याने भाज्यांचे दर गुरुवारी गडगडले. त्याची पुनरावृत्ती शुक्रवारी झाली. शुक्रवारी ६३२ ट्रक टेम्पो भाज्या आल्याने भाज्यांची आवक मोठय़ा प्रमाणात झाली. त्यामुळे खरेदीदारांना बाजारात पाय ठेवण्यास जागा नव्हती. दुपापर्यंत काही भाज्यांना उठाव न आल्याने वांगी, कोबी, शिमला मिरची आणि फरसबीसारख्या नाशिवंत भाज्या काही व्यापाऱ्यांना फेकून द्याव्या लागल्या. गुरुवारपेक्षा खरेदीदार जास्त असल्याने भाज्या विकल्या गेल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. घाऊक बाजारात भाज्या कितीही स्वस्त झाल्या तरी त्याचा फायदा किरकोळ विक्रेते ग्राहकांना देत नाही असे आढळून आलेले आहे. त्यामुळे शुक्रवारी खरेदी स्वस्तात केलेल्या भाज्या ग्राहकांना स्वस्त मिळतील याची कोणतीही खात्री नाही. रविवारी भाजी बाजार बंद राहणार आहे. त्यामुळे सोमवारी भाज्यांची आवक आणखी वाढून भाव गडगडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाज्यांचा हा नीचांक कायम राहिल्यास त्याचा फटका व्यापारी आणि शेतकरी यांना बसण्याची शक्यता आहे. भाज्यांना उठाव न मिळाल्यास त्यांना आता हमी भाव देण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कालच्याप्रमाणे आजही घाऊक बाजारात भाज्यांची आवक जास्त झालेली आहे. भाव मात्र सारखेच आहेत. रविवारी सुट्टी असली तरी काही व्यापारी माल पाठवितात. कमी दरामुळे शेतकरी आता भाज्या पाठविणे आवरते घेण्याची शक्यता आहे.

– कैलाश तांजणे, अध्यक्ष, नवी मुंबई घाऊक भाजीपाला महासंघ, नवी मुंबई