नवी मुंबई : नवी मुंबईतील कोपरखैरणे भागात असलेल्या एका उद्यानातील झाडाला दोरी बांधून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आज पहाटे प्रभातफेरीसाठी येणाऱ्या एका व्यक्तीच्या नजरेस लटकता मृतदेह पडला आणि त्यांनी याबाबत पोलिसांना कळवले होते.

पवन कुमार असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. कोपरखैरणे सेक्टर २३ येथे शांतिदुत महावीर उद्यान आहे. पावसाळा वगळता रोज या उद्यानात शेकडो लोक प्रभातफेरी (मॉर्निंग वाँक ) आणि उद्यानातील ओपन जिमचा वापर करीत व्यायामासाठी येतात. आज सकाळी काही जण नेहमी प्रमाणे पहाटे उद्यानात आले. उद्यानात गोल फेरी मारण्यासाठी सोय केली असून याच ठिकाणी एका झाडाला एक व्यक्ती गळफास घेतलेल्या अवस्थेत असल्याचे नजरेस पडले. त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा : उरणच्या कलाकारांनी विश्वचषकासाठी दिल्या रांगोळीतून शुभेच्छा

त्यांनी अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह खाली काढला. मृतदेहा जवळ आढळून आलेल्या कागदपत्रांवरून त्याचे नाव पवन कुमार असल्याचे समजले . तो कोपरखैरणे सेक्टर १९ येथे राहणारा असून तूर्तास आत्महत्या अशी घटनेची नोंद करण्यात आली आहे. ही घटना रात्री कधीतरी घडली असावी असा अंदाज आहे. पुढील तपास सुरू आहे. अशी माहिती उपस्थित पोलीस कर्मचाऱ्याने दिली.

हेही वाचा : नवी मुंबई : एपीएमसीतील शौचालय वितरण घोटाळा, दोन कंत्राटदारांना अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याच परिसरात दोन छोटी तर एक मोठे उद्यान आहे . सर्वच उद्यानात सकाळ व संध्याकाळ मोठ्या प्रमाणात व्यायामासाठी व फिरण्यासाठी लोक येत असल्याने सर्व ठिकाणी ओपन जिम आणि लहान मुलांना खेळणी लावण्यात आली आहे. दिवसा सर्व उद्यानात सुरक्षा रक्षक असतात मात्र रात्री तिन्ही उद्यानात मिळून एकच सुरक्षारक्षक गस्त घालत राखण करत असतो. त्यामुळे दोन छोट्या उद्यानात युवकांच्या रात्र पार्ट्याही होत असल्याच्या तक्रारी परिसरातील रहिवासी करतात. आता तर उद्यानात कुठूनही दिसेल अशा ठिकाणी असलेल्या झाडावरील एका फांदीला दोरी लावून आत्महत्या केल्याची प्रकार घडला आहे. त्यामुळे आता तरी सुरक्षा रक्षक संख्या वाढवतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.