पनवेल : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेसाठी पनवेल तालुक्यातील ४४ गावांमधून जमिनीचे भूसंपादन होणार आहे. मात्र अजूनही जमिनीचे भूसंपादन कोणत्या दराने केले जावे यासाठीचे दर ठरलेले नाहीत. ४४ पैकी २८ गावांचे दर निश्चित झाल्याची माहिती रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. परंतु ऑगस्ट महिन्यात अधिसूचना झाल्यावर नोव्हेंबरपर्यंत दरनिश्चित होणे अपेक्षित होते. भूसंपादनाच्या संथगतीच्या प्रक्रियेमुळे विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेचे काम एप्रिल महिन्यात कसे सुरू होणार याविषयी साशंकता निर्माण झाली आहे.

विरार -अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेमुळे पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील अलिबाग व इतर तालुक्यांमध्ये दळणवळणाचा नवा पर्याय मिळणार आहे. मुंबई-बडोदे महामार्गाचे काम पनवेल तालुक्यातील मोरबे गावापर्यंत ४० टक्के पूर्ण झाले आहे. दिवसरात्र या मार्गिकेचे काम सुरू असले तरी याच महामार्गाचा पुढील टप्पा हा विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेला जोडला जाणार असल्याने विरार-अलिबाग मार्गिकेसाठी तातडीने हालचाली होणे अपेक्षित आहे.

हेही वाचा : नववर्षापासून सीसीटीव्ही कार्यान्वित, बेलापूर ते वाशी दरम्यान सीसीटीव्हींचे जाळे; परिमंडळ २ मध्ये अद्याप प्रतीक्षाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई महानगर रस्ते विकास महामंडळाने यासाठी हुडको मंडळाकडून कर्जातून या मार्गिकेसाठी लागणाऱ्या सुमारे ३७ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. निधीची तरतूद झाली असली तरी रायगड जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जिल्ह्यातील भूसंपादनाची दरनिश्चिती प्रक्रिया लवकर झाल्यास शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला लवकर मिळू शकेल आणि महामार्गाचे काम लवकर सुरू होऊ शकेल. “विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेसाठीची दरनिश्चितीची प्रक्रिया सुरू आहे. २८ गावांचे दर निश्चित झाले आहेत. पुढील आठवड्यापर्यंत उर्वरित गावांच्या दरनिश्चितीची प्रक्रिया पूर्ण होत आहे”, असे रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी म्हटले आहे.