भूमिपूजनप्रसंगी जीवघेणा हल्ला

विविध विकासकामांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

(संग्रहित छायाचित्र)
नेरुळ येथील घटना; एकास अटक, एक पसार

नेरुळ सेक्टर १० येथे नगरसेविका श्रद्धा गवस यांच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरू असताना श्रीनिवास मोगविरा यांच्यावर प्राणहातक हल्ला करण्यात आला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. त्यात श्रीनिवास गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला व गालाला एकूण आठ टाके पडले आहेत. याप्रकरणी नेरुळ पोलिसांनी एकाला अटक केली आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून भावेश शंकर पणीकर असे त्याचे नाव आहे. अन्य एका आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती नेरुळ पोलिसांनी दिली.

विविध विकासकामांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात माजी मंत्री गणेश नाईक, महापौर जयवंत सुतार व अन्य मान्यवर उपस्थित राहणार होते. त्याच वेळी कार्यक्रमस्थळाजवळच उभे असलेले आरोपी शिविगाळ करत होते. नगरसेवक श्रद्धा गवस यांचे पती साधुराम गवस यांनी त्यांना जाब विचारला असता, दोन आरोपींमधील एकाने साधुराम यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला परंतु जमावाने त्यांना हुसकावून लावले. तरीही त्यांनी शिविगाळ सुरूच ठेवली. याबाबत श्रीनिवास मोगविरा यांनी विचारणा केली असता त्यातील एकाने मोगविरा यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला केला. जमावाने भावेश शंकर पणीकर याला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याचा दुसरा मित्र दुचाकीवरून पळून गेला. गंभीर जखमी असलेल्या मोगविरा यांच्यावर वाशी मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नेरुळ पोलिसांनी पणीकरविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नगरसेविकेच्या पतीला मारहाण करण्याचा प्रयत्न केला असून एकावर प्राणघातक हल्ला झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ तपास करून पसार झालेल्या आरोपीला अटक करावी, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.

– प्रदीप गवस,सभापती, एनएमएमटी

हल्ल्याचा भूमिपूजनाशी संबंध नाही आरोपी दारूच्या नशेत होता. त्याच्यावर नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पसार झालेल्या आरोपीचा शोध सुरू आहे. त्याला लवकरात लवकर अटक करण्यात येईल.

– अशोक रजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेरुळ

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Man attacked during lay stone foundation event in navi mumbai