नवी मुंबई : हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गांवरील महत्त्वाचे जुईनगर रेल्वेस्थानक सध्या सुविधाविहीनतेच्या गर्तेत सापडले असून, प्रवाशांना दररोज अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. स्थानकात स्वच्छतेचा अभाव, अपुरी बैठकव्यवस्था, बंद पडलेल्या पाणपोया, फेरीवाल्यांचा सुळसुळाट आणि बाहेरील असुरक्षितता यामुळे प्रवाशांच्या संयमाचा अंत होत आहे.
जुईनगर हे स्थानक पूर्वेकडील औद्योगिक पट्टा आणि पश्चिमेकडील घनवस्तीत राहणाऱ्या नागरिकांसाठी दैनंदिन प्रवासाचे केंद्रबिंदू आहे. रोजच्या हजारो प्रवाशांच्या गर्दीतही येथे मूलभूत सुविधा तोकड्या आहेत. फलाटांवरील बेंचेस मोडकळीस आल्या असून गंजलेल्या लोखंडी चौकटींवर बसण्याऐवजी प्रवाशांना उभ्याने प्रवासाची वाट पाहावी लागते. काही ठिकाणी या बेंचेस इतक्या खराब अवस्थेत आहेत की, अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
गर्दीच्या वेळी काही पाणपोया पूर्णपणे बंद असतात, तर उघड्या असलेल्या नळांमधून गाळट पाणी साचून राहते. अनेक ठिकाणी गुटखा, तंबाखू खाऊन थुंकण्यात आल्याने दुर्गंधीचा सामना करावा लागतो. कचरापेट्यांअभावी फेरीवाल्यांनी आणि काही प्रवाशांनी कचरा थेट फलाटावर टाकण्याचा सपाटा लावल्याचे चित्र आहे.
संध्याकाळी आणि रात्रीच्या सुमारास स्थानकाच्या प्रवेशद्वारांवर काही संशयास्पद आणि उपद्रवी टोळक्यांचा वावर वाढतो. महिला प्रवाशांना याचा विशेष त्रास होत असून, स्थानकात रात्रपाळीतील सुरक्षा रक्षकांची मागणी दिवसेंदिवस तीव्र होत आहे. काही स्थानिकांनी याबाबत प्रशासनाकडे तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप ठोस पावले उचलली गेलेली नाहीत.
रेल्वे प्रशासनाने जुईनगर स्थानकातील ही परिस्थिती गांभीर्याने घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी प्रवाशांची मागणी आहे. अन्यथा येथील अस्वच्छता आणि असुरक्षिततेमुळे भविष्यात गंभीर घटना घडण्याची शक्यता आहे.
संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी करण्याच्या सूचना दिल्या जातील आणि त्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल. – प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकरी, सिडको