पनवेल : मुंबईच्या समुद्र किनारपट्टीतील भूगर्भात रविवारी सकाळी काही सेकंदांसाठी झालेल्या भूकंपाच्या २.९ रिश्टर स्केलच्या सौम्य धक्क्याने नवी मुंबई व पनवेल परिसर हादरुन गेला. भूगर्भातून येणारा काही सेकंदांचा आवाज आणि भूकंपाच्या सौम्य धक्क्याने पनवेल व नवी मुंबई लगतच्या खाडी लगतच्या इमारतींमधील नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली. नेमकं काय झाले याबाबत सरकारी अधिकाऱ्यांना माहिती घेण्यासाठी अनेक तास लागले. अखेर दुपारी वेधशाळेच्या खात्रीलायक माहितीनंतर पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी हा भूकंपाचा सौम्य धक्का असल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले.

रविवारी सकाळी भूगर्भातून मोठ्या आवाजासह धक्क्याने घरात काहीतरी गडगडल्या सारखे झाले. या भूकंपाचे प्रवणक्षेत्र खाडीलगतच्या परिसरात असल्याने पनवेल परिसरात खाडीलगत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. अखेर वेधशाळेने पनवेल महापालिकेला दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी नऊ वाजून ५० मिनिटे ५४ सेकंदाने नवी मुंबई लगतच्या समुद्र किनारपट्टीच्या आत भूगर्भात १५ किलोमीटरच्या आत २.९ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्यामुळे मोठी हानी झाली नाही. नवी मुंबई व पनवेल हा परिसर सिडको महामंडळाने खाडीवरील कांदळवनावर मातीचा भराव करुन वसवला आहे. त्यामुळे अतिवृष्ठीत पुराच्या भितीमध्ये या परिसरात रहिवाशी राहतात.

हेही वाचा : उरणमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी, प्रदूषण आणि उकाड्यापासूनही दिलासा

अनेक वर्षानंतर भूकंपाचा हादरा बसल्याने या परिसरात भूकंपामुळे होणाऱ्या हानीबाबत दिवसभरात नागरिकांमध्ये चर्चा सुरु होती. रविवारी सकाळी भूकंपाच्या हादऱ्याने अनेकांच्या घरातील वस्तू काही सेकंदांसाठी हलल्या सारख्या झाल्या. मोठा आवाज झाल्याचे कामोठे येथील नागरिकांनी सांगितले. अनेकांनी घरातील खिडकी उघडून बाहेर काही झाले का, याची माहिती घेतली. मात्र इतर सिडको वसाहतींमध्ये अशाच प्रकारचा हादरा बसल्याचे नागरिकांनी सांगितले