पनवेल – पनवेल महापालिकेने सर्वसामान्य नागरिकांवर लादलेला मालमत्ता कर तातडीने कमी करावा, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे आणि पावसाळ्यात पनवेल व खारघरकरांवर ओढवणारे पाणी संकट तातडीने दूर करावे, या तीन प्रमुख मागण्यांसाठी यापूर्वी अनेक आंदोलने झाली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठीदेखील वेळ दिला नाही. त्यामुळे राज्यातील महायुती सरकारने हीच टाळाटाळीची भूमिका कायम ठेवली, तर भाजप-महायुती सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अखेर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग रोखण्याचा इशारा बुधवारी पनवेल येथे महाविकास आघाडीतील नेत्यांनी दिला.

बुधवारी पनवेल महापालिकेच्या मुख्यालयावर असंख्य कार्यकर्त्यांसह मोर्चा काढून महाविकास आघाडीने पनवेलमध्ये शक्तीप्रदर्शन केले. या मोर्चात भारतीय शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस पक्ष तसेच इतर घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ऑक्टोबर २०१६ साली स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेने करदात्यांना २०२१ साली मालमत्ता कराची देयके विलंबाने पाठवली, ही महापालिका प्रशासनाची चूक असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

पहिल्या पाच वर्षांचा कर पूर्णपणे माफ करण्याची मागणी असताना, केवळ शास्तीमध्ये ९० टक्के सवलत देऊन जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या व्यासपीठावरून करण्यात आला.पनवेल, उरण आणि नवी मुंबईचे आमदार भाजपचे असतानाही, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात आले नाही, याबाबतही नेत्यांनी संताप व्यक्त केला. खारघर सारख्या नियोजित उपनगरातही पावसाळ्यात रहिवाशांना टॅंकरचे पाणी विकत घ्यावे लागते, हे वास्तव बदलून २४ तास मुबलक पाणीपुरवठा कधी होणार, असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.

या मोर्चाचे नेतृत्व शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, अतुल म्हात्रे, शिवसेना (उद्धव ठाकरे) चे संजोग वाघेरे, बबन पाटील, शिरीष घरत, मनसेचे योगेश चिले, काँग्रेसचे सुदाम पाटील, श्रुती म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) च्या भावना घाणेकर, शिवसेनेचे दीपक निकम, शेकापचे प्रकाश म्हात्रे व इतर पदाधिकाऱ्यांनी केले.सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेला मोर्चा दुपारी बारा वाजता महापालिका मुख्यालयासमोर दाखल झाला. नेत्यांच्या भाषणासाठी महापालिकेकडून मोहल्ल्याकडे जाणारा मार्ग रोखून ट्रक आडवा उभा करण्यात आला आणि त्यावरून नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

पोलिस बंदोबस्त असूनही रस्ता अडवण्याबाबत पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. यापूर्वी महाविकास आघाडीने केलेली आंदोलने महात्मा गांधी उद्यानाशेजारील मोकळ्या मैदानावर होत असत; मात्र यावेळी आंदोलनाकडे वारंवार होत असलेल्या दुर्लक्षामुळे थेट महापालिका मुख्यालयासमोरील रस्ता अडवण्याचा निर्णय घेण्यात आला.