नवी मुंबई : काही दिवसांच्या पूर्वी पनवेल परिसरात चालत्या कार वर चढून स्टंट बाजी करणाऱ्या महिलेच्या विरोधात गुन्हा नोंद केला होता. हि घटना ताजी असतानाच आता रबाळे परिसरात चालत्या रिक्षावर स्टंट बाजी करतानाचे चित्रीकरण समाज माध्यमातून व्हायरल झाले. याची दखल घेत पोलिसांनी त्या स्टंट बाजाला शोधून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
धावत्या लोकलच्या दरवाजात उभा राहून स्टंट करणाऱ्यावर रेल्वे पोलिसांची नजर असते मात्र नजर चूकवून अनेक जण स्टंट करतात. त्यात अनेकांचा मृत्यू हि झाला आहे. रेल्वे यार्ड मध्ये रिल्स बनवण्यासाठी स्टंट करताना ओव्हर हेड वायरल स्पर्श झाल्याने एक युवक भाजला होता त्याच्यावर उपचार सुरु असताना काही दिवसांच्या पूर्वी त्याचा मृत्यू झाला.
भर रस्त्यात चालत्या कारच्या छतावर एक महिला नृत्य करण्याचा प्रयत्न करत असतानाचे चित्रीकरण व्हायरल झाले होते. तिचा शोध घेत तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटना ताज्या असताना आकाश चव्हाण या युवकाने भर पावसात धावत्या रिक्षाच्या मागे उभे राहून स्टंट बाजी केली होती. हि घटना रविवार २७ तारखेला रात्री दीडच्या सुमारास घडली होती. या रिक्षाच्या मागून येणाऱ्या एका वाहन चालकाने त्याच्या स्टंट बाजींचे चित्रीकरण करून समाज माध्यमात टाकले होते. याची पोलिसांनी दखल घेत त्याचा शोध सुरु केला. तपास करत असताना हि घटना रविवारी अपरात्री दीडच्या सुमारास ठाणे बेलापूर मार्गावर दिघा येथील मुकुंद कंपनी समोर घडल्याचे समोर आले.
चित्रीकरण करणार्याने रिक्षा क्रमांक सहल दिसेल असे चित्रीकरण केल्याने पोलिसांनी त्या रिक्षाचा शोध घेतला. त्यात अमितकुमार घुरीया हा २२ वर्षीय युवक रिक्षा चालवत असल्याचे समोर आले. त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याचा साथीदार आकाश चौहान (वय २२) ने हि स्टंट बाजी केल्याचे समोर आले. आकाश हा दिघ्यातील न्यू गणेश नगर येथे राहत असून अन्य साथीदार ओमकार बाप्रप (वय २२) हा दिघ्यातील आंबेडकर नगर येथे राहणार आहे. याबाबत रबाळे एमआयडीसी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला आहे. अशी माहिती रबाळे एमआयडीसी पोलिसांनी दिली.