पनवेल : पनवेल महापालिकेच्या निष्क्रिय आणि भ्रष्ट कारभाराविरोधात मंगळवारी दोन ठिकाणी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. सकाळी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने पनवेल महापालिकेच्या प्रवेशद्वारावर टाळे ठोकून आंदोलन केले, तर दुपारी खारघरमधील ‘खारघर सीटीझन फोरम’ने निकृष्ट दर्जाच्या रस्ते कामांवरून अधिकाऱ्यांचा आणि ठेकेदारांचा निषेध करत महापालिकेचा समाचार घेतला. या दोन्ही घटनांनी महापालिका प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत.
काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील महापालिकांच्या आयुक्तपदी आय.ए.एस. अधिका-यांची नेमणूकीची घोषणा केली होती. पनवेल महापालिकेवर सुद्धा आयएएस अधिका-यांची नेमणूक कधी करणार अशी चर्चा या आंदोलनादरम्यान सुरू झाली आहे. पनवेल महापालिकेच्या कारभारातील ढिसाळपणाचा निषेध करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेने मंगळवारी सकाळी महापालिका प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावर टाळे ठोक आंदोलन केले. पाणीपुरवठा, रस्त्यांची दुर्दशा, स्वच्छतेचा अभाव आणि नागरिकांच्या मूलभूत सोयींकडे दुर्लक्ष याविरोधात हे आंदोलन झाले.
अनेकदा निवेदन देऊनही कारवाई न झाल्याने अखेर शिवसैनिकांनी हा पवित्रा घेतला. “पनवेलकरांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारं प्रशासन आम्हाला नको,” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या आंदोलनात शिवसेनेचे उपनेते बबनदादा पाटील, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, भरत पाटील, रामदास पाटील, अवचित राऊत आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेनेने प्रशासनाला इशारा दिला की, “महापालिका काम करावी, नाहीतर खुर्ची सोडावी.”तसेच दुपारच्या सत्रात खारघर सिटीझन फोरमने नव्याने बांधलेल्या रस्त्यांवर पुन्हा पडलेल्या खड्ड्यांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. फोरमने आरोप केला की रस्त्यांची कामे सत्ताधारी आमदारांच्या कुटुंबीयांच्या कंपनीकडे देऊन ठेकेदारांचा फायदा साधला जात आहे.
त्यामुळे शहर खड्डेमय झाले असून प्रशासन ठेकेदारांच्या आहारी गेले आहे. फोरमच्या सदस्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन चालू काम थांबवले आणि “पॅचवर्क करून थुकपट्टी लावण्याचे काम चालणार नाही,” असा इशारा दिला. त्यावर अधिकाऱ्यांनी नव्याने डांबरीकरणाचे आश्वासन दिले. या दोन घटनांमुळे नागरिकांचा रोष उफाळून आला असून, पनवेल महापालिकेच्या कारभारावर जनतेचा विश्वास डळमळीत होताना दिसतो.महापालिका कोणत्याही दोषी कंत्राटदाराला पाठिशी घालत नसून सध्या असणारे खड्डे तातडीने बुजविण्यासाठी पॅचवर्कचे काम सुरू होते.
पावसाळा पुर्ण थांबून वातावरण पुर्ण कोरडे झाल्यावर शास्त्रोक्त पद्धतीने रस्त्यांचे काम ज्या कंपन्यांना दिले आहे त्यांच्याकडून पुन्हा नव्याने करून घेण्यात येईल. यासाठी महापालिका कोणताही अतिरीक्त खर्च करणार नाही. नव्याने बांधलेल्या रस्त्यांवर खड्यांविषयी महापालिकेने जी समिती नेमली आहे त्या समितीचा अहवाल आल्यानंतर तो जनतेसाठी प्रसिद्ध केला जाईल. – मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल महापालिका