नवी मुंबई : मुंबईतील लोकमान्य टिळक व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर परराज्यांतून येणाऱ्या व जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मुंबईबाहेर रोखता यावे यासाठी पनवेल येथे रेल्वे टर्मिनस उभारण्यात येत असून या प्रकल्पाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत मुंबईबाहेरचे पहिले रेल्वे टर्मिनस पनवेल येथे सुरू होणार असल्याचे संकेत सिडकोकडून मिळाले आहेत. सिडकोने दिलेल्या पाच एकर भूखंडावर हा प्रकल्प सुरू असून आठ फलाटे उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे दक्षिण व कोकणातून येणाऱ्या सर्व रेल्वे गाडय़ांना या ठिकाणी विश्रांती घेता येणार आहे. प्रवाशांना येथून लोकलने आपल्या ऐच्छिक ठिकाणी जाता येणार आहे.
मुंबईत दिवसाला ७५ लाखांपेक्षा जास्त प्रवाशी रेल्वेने प्रवास करतात आणि त्यासाठी अडीच हजार रेल्वे गाडय़ांच्या फेऱ्या मुंबई उपनगरीय क्षेत्रात होतात. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाडय़ांना अनेक वेळा प्रतीक्षेचा सामना करावा लागतो. लांब पल्ल्याच्या गाडय़ांमुळे अनेक वेळा उपनगरीय रेल्वे सेवेचे वेळापत्रक कोलमडून पडते.
या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडय़ांना मुंबई सेट्रल, लोकमान्य टिळक आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे विश्रांती स्थानके नेमून देण्यात आलेली आहेत. मुंबईमधील या रेल्वे गाडय़ांच्या गर्दीवर उपाय म्हणून मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गाच्या शेवटच्या स्थानकांना रूपांतर करून त्या ठिकाणीच प्रवाशांना शेवटचे स्थानक देण्यात यावे असा एक प्रस्ताव गेली अनेक वर्षे भारतीय रेल्वे प्रशासनाकडून प्रस्तावित होता. यासाठी सिडकोने पनवेल स्थानकाच्या आजूबाजूला असलेली पाच एकरपेक्षा जास्त जमीन देण्याची तयारी सर्वात प्रथम दाखवली. २०१६ मध्ये सिडको आणि मध्य रेल्वेच्या संयुक्त विद्यमाने पनवेल स्थानकाला टर्मिनसचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. सिडकोच्या आर्थिक मदतीमुळे मध्य रेल्वेने नवी मुंबईत तीन मार्ग कार्यान्वित केलेले आहेत. सिडकोच्या या पुढाकारामुळे पनवेल टर्मिनसचे काम प्रगतिपथावर असून ७५ टक्के स्थापत्य काम पूर्ण झाल्याचे सिडकोच्या एका उच्च अधिकाऱ्याने सांगितले. या टर्मिनसमध्ये सर्व सेवासुविधांयुक्त फलाटे असून त्यांची उंची मर्यादित ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे या फलाटांवर २६ डब्यांची रेल्वेगाडी उभी राहू शकणार आहे. नवी मुंबईतील या पहिल्या टर्मिनसमुळे दक्षिणेत आणि कोकणात गोव्यापर्यंत जाणाऱ्या रेल्वेचे प्रस्थान आणि आगमन स्थान हे पनवेल टर्मिनस राहणार आहे. या ठिकाणी प्रवाशांना लोकलने येऊन या लांब पल्ल्याच्या रेल्वेने प्रवास करावा लागणार आहे. याच ठिकाणी उतरून मुंबई व इतर मुंबई प्रदेश क्षेत्रात लोकल रेल्वेने जावे लागणार आहे. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे फेऱ्याही वाढवण्यात येणार आहेत.
कळंबोली येथे कोचिंग कॉम्प्लेक्स
पनवेल टर्मिनस तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी दुसऱ्या फेरीसाठी तयारी करणाऱ्या रेल्वेच्या डागडुजी व स्वच्छतेसाठी कळंबोली येथे कोचिंग कॉम्प्लेक्स उभारले जाणार आहे. यासाठीही सिडकोने भूखंड उपलब्ध केला असून कळंबोली ते पनवेल या मार्गावर एक तिसरा रेल्वे मार्ग उभारण्यात येत असून रेल्वे गाडय़ांच्या दुरुस्ती, डागडुजी व स्वच्छतेसाठी हा मार्ग सोयीस्कर होणार आहे. सध्या या लांब पल्ल्याच्या रेल्वे वाडिबंदर आणि माजगाव येथे दुरुस्त केल्या जात आहेत. रेल्वेच्या या सर्व संचालनासाठी १५ हजार चौरस मीटर आकाराची एक इमारतदेखील बांधली जात आहेत.