गेल्या काही दिवसांत नवी मुंबईचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनधिकृत बांधकामांविरोधात उघडलेल्या जोरदार आघाडीमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईचा विरोध म्हणून सोमवारी संबंधितांकडून नवी मुंबई बंदची हाक देण्यात आली आहे. बंदची हाक देणाऱ्यांमध्ये सर्वपक्षीय, प्रकल्पग्रस्त आणि व्यापाऱ्यांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांत मुंढे यांनी दिलेल्या आदेशानंतर पालिकेने अनधिकृत बांधकामे, हॉटेलांच्या बेकायदेशीरपणे वाढवण्यात आलेल्या शेडस् आणि गावठाणातील अनेक बांधकामांवर कारवाई केली होती. याशिवाय, ऐरोली सेक्टर १५ परिसरात पालिकेकडून उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या खर्चाला कात्री लावण्यासाठी मुंढे यांनी पावले उचलली होती. या स्मारकाचे वेगळेपण आणि सर्वात उंच म्हणून नोंद ठरणाऱ्या डोम त्याचबरोबर मार्बल अशा १९ कोटींहून अधिक खर्चाला आयुक्तांनी आक्षेप घेत असून स्मारकाच्या डोमला असणाऱ्या मार्बलऐवजी पांढरा शुभ्र रंग वापरण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे महापौर सुधाकर सोनवणे नाराज झाले होते. स्मारकाची नियोजितपणे उभारणी न झाल्यास त्यांनी आयुक्तांविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता.
नवी मुंबईतील बेकायदा बांधकाम आणि अतिक्रमणावर बिनधास्त हातोडा चालविण्याचे आदेश पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेले होते. त्यामुळे पालिकेच्या बेकायदा बांधकामविरोधी पथकाने कारवाईचा सपाटा लावला आहे. यात अनेक प्रार्थनास्थळांचाही समावेश आहे.