पूर्वप्राथमिक वर्ग सुरू, विद्यार्थी-शिक्षकांमध्येही उत्साह

नवी मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेशानुसार नवी मुंबईतही आज शिशुवर्ग ते १२ वीचे वर्ग  ऑफलाइन पद्धतीने  सुरु करण्यात आले. शिशुवर्गातील विद्यार्थी व पालकांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. १६ मार्च २०२० नंतर जवळजवळ दोन वर्षांनंतर प्रथमच पूर्वप्राथमिक वर्गातली बालके शाळेत आली होती. त्यामुळे एकंदरीतच खासगी, महापालिका शाळांमध्ये मोठे उत्साहाचे व आनंदाचे वातावरण होते. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. अनेक शाळांमध्ये मुलांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा शाळांमध्ये मुलांचा किलबिलाट पाहायला मिळाला. संपूर्ण शहरात विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यामध्ये उत्सुकता दिसत होती. शहरात महापालिका तसेच खासगी शाळांमध्येही करोनानंतरच्या पहिल्या दिवसाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळाला.

प्राथमिक विभागांमध्ये मात्र माध्यमिक व उच्च्माध्यमिक विद्यार्थ्यांच्या मानाने कमी उपस्थिती असल्याची माहिती पालिका प्रशासनाने व खासगी शाळांतील मुख्याध्यापक व संस्थाचालकांनी दिली. नवी मुंबई शहरात महापालिकेच्या ५५ प्राथमिक व २१ माध्यमिक तसेच विविध खाजगी शाळांची संख्या ३६५ असून यामधील हजारे विद्यार्थ्यांची उपस्थिती शाळांमध्ये दिसत होती. पालिकेने करोनाचे नियम पाळून सामाजिक अंतर ठेवून शाळा सुरू करण्याची परवानगी दिल्याने शाळा व्यवस्थापनानेही एका बाकावर एक याप्रमाणे दोन टप्प्यात वर्ग भरवण्याचे नियोजन केले होते. अनेक शाळांमध्ये सजावटही करण्यात आली होती. एकंदरीतच शाळा सुरू झाल्याने शाळा व्यवस्थापन, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

नवी मुंबई शहरात ३६५ शाळा असून शासनाच्या आदेशानुसार सोमवारी पूर्वप्राथमिक ते १२ वीचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. बहुतांश शाळा सुरु करण्यात आल्या असून काही खासगी शाळांकडून पालकांची परवानगी घेतली जात असून सर्वच शाळामध्ये उत्साह पाहायला मिळाला. महापालिकांसह विविध शाळांमध्ये शिक्षणोत्सव पाहायला मिळाला.

– जयदीप पवार, उपायुक्त  शिक्षण,नवी मुंबई महापालिका

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर शाळा भरणे हा पालकांसाठी व मुलांसाठी तसेच सर्वासाठीच मोठा सण, उत्सव साजरा करत असल्याचा आनंद प्रत्येकामध्ये पाहायला मिळत होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिनेश मिसाळ, संचालक, विद्याभवन, नेरुळ