नवी मुंबई : यंदाचा पावसाळा लांबला असला तरी, आता अनेक ठिकाणी पावसाने उसंत घेतली आहे. जसजसा पाऊस कमी होत आहे, तसतसे नवी मुंबईत हवेतील प्रदूषणाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यात, शहरात सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांमुळे धूळकणांचे प्रमाण वाढू नये यासाठी नवी मुंबई महानगपालिकेने नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅमच्या अंतर्गत पुन्हा एकदा प्रदूषणग्रस्त भागांमध्ये पाण्याची फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. या पाण्याच्या फवारणीमुळे हवाप्रदूषणावर नियंत्रण आणणे आणि लोकांना स्वच्छ, निरोगी हवा मिळवून देणे शक्य होत आहे.

नवी मुंबई शहरात एमआयडीसी लगत असलेल्या विभागांमध्ये रात्रीच्या वेळी उग्र वास येण्याचे प्रकार वाढतात. थंडीच्या दिवसांमध्ये तर, या वासाचे प्रमाण अधिक वाढते. धुरक्यांचा आधार घेत एमआयडीसीतील कंपन्या हवेमध्ये दूषित वायू सोडून देतात. त्यामुळे वाशी, कोपरखैरणे, घणसोली, नेरूळ, तुर्भे इत्यादी विभागातील नागरिकांना श्वसनाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी येतात. त्याचबरोबर नवी मुंबई शहरात मोठया प्रमाणावर विकास कामे सुरू आहेत. त्यामुळे ही हवेत धुळीचे प्रमाण वाढत आहे.त्यामुळे शहरातील हवेची गुणवत्ता कमी होत असल्याची चिन्हे आहेत.

काही वर्षांपूर्वी स्वच्छता सर्वेक्षणात नवी मुंबई शहराने देशात तिसरा क्रमांक पटकावला होता. परंतू, राष्ट्रीय वायू गुणवत्ता निर्देशांक- केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने संकेतस्थळावर जाहीर केलेल्या निर्देशांक मूल्यातून नवी मुंबईची हवा ही अति खराब असल्याचेही यावेळी स्पष्ट झाले होते. त्यावेळी नवी मुंबई शहरातील स्वच्छतेसह हवा गुणवत्ता कशी चांगली राहिल असे उद्दिष्ट तत्कालीन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी ठेवले होते. त्यानुसार, त्यांनी शहरात उपाययोजना करण्यास देखील सुरुवात केली होती.

यामध्ये त्यांनी हवेतील धूलिकण कमी करण्यासाठी पाणी फवारणी मशीन घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर, केंद्र सरकारच्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅमच्या अंतर्गत पाणी फवारणी मशीन शहरात दाखल झाली होती. ज्या ठिकाणी या फवारणीची आवश्यकता होती,त्याठिकाणीच पाण्याची फवारणी केली जात.

परंतू, आता गेले काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. यामुळे वातावरणात सकाळच्यावेळी काहीसा प्रदूषणाचा थर निर्माण होत आहे. तसेच दुसरीकडे शहरात विविध विकास कामे सुरु आहेत. विकास कामांमुळे शहरातील हवेमध्ये धुळीकणांचे प्रमाण वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन पुन्हा एकदा नवी मुंबई महापालिकेने शहरात पाणी फवारणी सुरु केली आहे. विशेषकरुन एमआयडीसी परिसरात ही फवारणी केली जात आहे.

कशी केली जाते फवारणी

वाढत्या हवाप्रदूषणावर नियंत्रण आणणे आणि लोकांना स्वच्छ, निरोगी हवा मिळवून देण्यासाठी नवी मुंबई शहारत पाणी फवारणी मशीन वाहन (धूळ नियंत्रण वाहन) फिरवले जाते. यामार्फत हवेतील सूक्ष्म धूलिकण (PM10 आणि PM2.5) यांचे प्रमाण २० ते ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे लक्ष्य असते. या वाहनाचा वापर मुख्यतः बांधकामस्थळे, पुनर्विकास प्रकल्प परिसर, औद्योगिक भाग आणि रस्त्यांवरील धूळ कमी करण्यासाठी केला जातो.

ज्या परिसरातील हवेत प्रदूषण दिसत असेल त्या परिसराची तक्रार नागरिकांनी मेल द्वारे किंवा दुरध्वनीद्वारे महापालिकेकडे करावी. त्यानंतर, संबंधित ठिकाणी पाण्याची फवारणी करणारी मशिन पाठवली जाईल आणि तेथे फवारणी केली जाईल. अगदी बेलापूर पासून ते दीघापर्यंत या फवारणी मशीनची व्यवस्था आहे.- राजेश पवार, कार्यकारी अभियंता, नवी मुंबई महापालिका.