29 February 2020

News Flash

मेंदूशी मैत्री : अल्कोहोल : मेंदूपासून शरीरापर्यंत परिणाम

लहानपणी चालण्याचं कौशल्य शिकताना सेरेबलमचाच आधार असतो. हा अवयव विकसित होतो तेव्हापासून चालण्याचं कौशल्य शिकलेलं असतं.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. श्रुती पानसे

शहाण्या, समजूतदार, तथाकथित बुद्धिमान व्यक्तीच्या – पुरुषांच्या किंवा स्त्रियांच्या हातून प्रचंड चुका होतात, जेव्हा या व्यक्ती अल्कोहोलच्या अमलाखाली असतात.

आपण सर्व लहानपणीच आपल्या दोन पायांवर व्यवस्थित चालायला शिकतो. पण दारूच्या नशेत मात्र कितीही मोठा माणूस असला तरीसुद्धा त्याला व्यवस्थित चालता येत नाही. त्याचा तोल जातो. त्यामुळे ही माणसं सरळ रेषेत चालू शकत नाहीत. याचं कारण अल्कोहोलचा परिणाम मेंदूतल्या सेरेबलम नावाच्या अवयवावर होत असतो. लहानपणी चालण्याचं कौशल्य शिकताना सेरेबलमचाच आधार असतो. हा अवयव विकसित होतो तेव्हापासून चालण्याचं कौशल्य शिकलेलं असतं. पण इथे सेरेबलमवरच अल्कोहोलचा पडदा असतो. त्यामुळे एक वर्षांचं असताना शिकलेलं मूलभूत कौशल्यही जमेनासं होतं. लहानपणी मूल डुगडुगत चालत असतं, तेव्हा त्याचं कौतुक होतं, त्याला प्रोत्साहन मिळतं. अल्कोहोलमुळे माणसं डुगडुगतात, तेव्हा इतरांचं मनोरंजन होतं!

माणसं अल्कोहोल घेतात तेव्हा त्यांना आसपासच्या जगाचा विसर पडतो, माणसं खूप बोलतात. अतिशय आत्मविश्वास निर्माण होतो. मेंदूत सेरोटोनिन निर्माण झाल्यामुळे आनंदाची भावना निर्माण होते. लिंबिक सिस्टीम या भावनांच्या क्षेत्रावर परिणाम झाल्यामुळे भावना नियंत्रणात राहत नाहीत. उचंबळून येतात. त्यामुळे माणसं खूप जास्त हसतात, खूप जोरजोरात आणि अश्रू ढाळून रडतात. काही जण विनाकारणच शूरवीर आणि आक्रमक होतात. यामुळेदेखील इतरांचं मनोरंजन होतं. दिसणं – ऐकणं यावरही परिणाम होतो. वेदना झाल्या तर त्याही जाणवत नाहीत. मेंदूला अल्कोहोलनं गुंगवलेलं असतं.

अल्कोहोल पीत राहिल्यामुळे मेंदूतली भाषा आणि विचार करण्याच्या क्षेत्रावरचं – सेरेब्रल कॉर्टेक्सवरचं नियंत्रण सुटतं. सारासार विवेकाचं

हेच केंद्र असतं, ते योग्य रीतीने काम करेनासं होतं. यामुळे हातून मारामारी, खून, बलात्कार, अपघात यांसारखे टोकाचे गुन्हे घडतात. उत्तम शिक्षण घेतलेल्या, उत्तम करिअर करणाऱ्या माणसांच्या हातून केवळ या अमलाखाली असल्यामुळे गुन्हे घडतात. काही लोक दिवसभर राबून जे काही पैसे कमवतात, ते रात्री संपवून टाकतात. अल्कोहोलचा परिणाम काही काळापुरता असतो. परिणाम संपला की माणसं पुन्हा मूळ पदावर येतात. पण या पेयाचं व्यसन लागतं. त्यामुळे मेंदूवर आणि हळूहळू संपूर्ण शरीरावर याचे वाईट परिणाम झाल्याशिवाय राहत नाहीत.

contact@shrutipanse.com

First Published on July 11, 2019 12:10 am

Web Title: alcohol results from the brain to the body abn 97
Next Stories
1 कुतूहल : दूरदूरची अंतरे
2 मेंदूशी मैत्री : धोक्याची जाणीव करून देणारा – ब्रेन स्टेम
3 कुतूहल : ताऱ्याचा पराशय
X
Just Now!
X