प्राण्यांमधील भांडण साथीदारासाठी (मेटिंग पार्टनर), प्रतिस्पध्र्यामध्ये, भावंडांमध्ये, पालक आणि पिल्लांमध्ये, हद्दीवर अतिक्रमण तसेच अन्न अशा अनेक कारणांमुळे होते. हे कधी तरी विकोपाला जाऊन त्याचे रूपांतर एकमेकांवर हल्ला करण्यात होते आणि संघर्ष सुरू होतो. गट करून राहणाऱ्या प्राण्यांमध्ये काही क्षुल्लक कारणांवरूनदेखील हाणामारी होऊ शकते. मुंग्यांच्या दोन नजीकच्या गटांमधील जीवघेणी मारामारी, जोडीदारासाठी दोन नर वाघांमधील संघर्ष, जनावराच्या मृत शरीरावरून होणारा गिधाडांमधील संघर्ष, दोन नर चितळांमध्ये शिंगे एकमेकांत अडकवून होणारी मारामारी, तसेच रिकाम्या शंखासाठी संन्यासी खेकडय़ांमधील भांडण.. हे सर्व विकोपाला गेलेला संघर्ष दर्शवितात.

असे संघर्ष प्राण्यांमध्ये सर्वत्र दिसतात. अशा संघर्षांत खूप काही पणाला लागलेले असले तरी, बरेच वेळा ताकदीचे केवळ प्रदर्शन करून, देहबोलीने पवित्रा घेऊन संघर्षांचे निराकरण केले जाते. हे वर्तन ‘उत्क्रांतीतील स्थिर रणनीती’ म्हणून स्थापित होते. तरीही काही वेळा अशा संघर्षांची परिणती हिंसा, इजा आणि अगदी क्वचित मृत्यूतही होते. परंतु प्राण्यांच्या संघर्षांत ‘एकमेकांना शारीरिक इजा’ हा अगदी शेवटचा उपाय असतो. एरवी अनेक गोष्टींमुळे प्रत्यक्ष संघर्ष टाळला जातो. सस्तन प्राण्यांमध्ये, विशेषत: कळपात राहणाऱ्या सस्तन प्राण्यांत (प्रायमेट्स) संघर्ष निराकरणासाठी सलोखा करणे, मनधरणी करणे, मन वळविणे असे प्रयत्न केले जातात. परंतु अन्नासाठीच्या संघर्षांनंतर मात्र समेट क्वचित होताना दिसतो. एकाच प्रजातीतील सदस्य अन्न, पाणी, निवारा, प्रदेश अथवा मेट (प्रजननातील साथी) या कारणास्तव संघर्ष करतात. हा संघर्ष जास्त करून दोन प्राण्यांमध्ये होतो; तर गटांमधील प्राण्यांमध्ये होते ते युद्ध.. आणि हे एखाद्या प्रदेशाच्या मालकी हक्कावरून सुरू होते.

बहुधा रागाचे प्रदर्शन करतेवेळी विविध प्रकारचे आवाज काढले जातात. खरे म्हणजे, रागाचे प्रदर्शन आणि अधीनपणाचे प्रदर्शन हे दोन्हीही एकमेकांची ताकद जोखण्यासाठी असतात आणि त्यामुळेच तीव्र संघर्ष टाळता येऊ शकतो. अन्नासाठीच्या श्रेणीय व्यवस्थेमध्ये होणारे संघर्ष हे बरेचवेळा श्रेणी राखण्यासाठी अथवा मिळविण्यासाठी वैयक्तिक पातळीवर होताना दिसतात. परंतु तीव्र संघर्ष टाळण्याचा एक उपाय म्हणून सामाजिक पदानुक्रम ठरविला जातो, ज्यामध्ये अन्नासाठीचा सरळ रेषेतील पदानुक्रम म्हणजेच ‘सर्वात प्रबळ ते सर्वात दुर्बळ’ असा असतो. जास्त बुद्धिमान प्रजातींमध्ये ही व्यवस्था सुधारित रूपात दिसते. चिम्पान्झीसारख्या प्राण्यात सौदेबाजी, सामूहिक नेतृत्व, फूट— फितुरी यांसारख्या रणनीतीसुद्धा दिसून येतात!

– डॉ. नीलिमा कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org