पिल्लांचे संगोपन हे काही प्राण्यांमध्ये त्यांनी आखलेले ‘वर्तणूक’ आणि ‘उत्क्रांती’साठीचे धोरण असते. जीवांची उत्क्रांती पाहता, उभयचर प्राण्यांपासून जीवन पाण्यातून जमिनीवर आले. केवळ २५ टक्के उभयचर प्रजाती पिल्लांच्या संगोपनात गुंतलेल्या असल्या, तरी त्यांच्यातील पिल्लांच्या संरक्षण आणि संगोपनाची व्यवस्था अतिशय गुंतागुंतीची दिसते. बहुतांश उभयचरांत अंडय़ाचे फलन मादीच्या शरीराबाहेर होते. हे प्राणी अंडी घालण्याची जागा सुरक्षित आणि पाण्याजवळ असण्याची नेहमीच काळजी घेतात, कारण ती त्यांची जगण्यासाठीची गरज असते. तळ्याकाठच्या झाडाच्या पाण्यावर येणाऱ्या फांदीच्या पानांवर घातलेली अंडी, फेसामध्ये वाढणारी अंडी, पाणवनस्पतीच्या पानाला चिकटवलेली अंडी हेच दर्शवतात.

काही ‘हायला’सारखे बेडूक मातीच्या, ‘फायलोमेडय़ूसा’सारखे पानांच्या अथवा ‘ट्रायटोन’सारखे फांद्यांच्या साहाय्याने घरटी तयार करतात. श्रीलंकन बेडूक ‘ऱ्हाकोफोरस’ची मादी पोटाला अंडी चिकटवून ठेवते. ‘अलायटस’ची मादी जमिनीवर एका त्रिकोणी जागेत अंडी घालते. अंडय़ांचे फलन झाल्यावर नर ती अंडी त्याच्या मागील पायाच्या मदतीने पाठीवर ओढून घेतो. आवश्यक तेवढी आद्र्रता आणि तापमान यांची काळजी घेतली जाते. पिल्ले बाहेर पडण्याची वेळ जवळ आली, की नर एखादे तळे शोधतो आणि पिल्ले सरळ पाण्यात जाऊ शकतील अशा तऱ्हेने पाण्यात थांबतो.

‘पिपा’ नावाचा टोड अंडी वाहून नेण्यासाठी पाठीवरील एका कातडीच्या घडीचा वापर करतो. प्रत्येक अंडय़ासाठी पाठीवर एक खड्डा तयार होतो आणि अंडय़ाचे संरक्षण होते. अर्थात, पिल्लांना पाण्यात सोडण्याची व्यवस्थासुद्धा होते. दक्षिण अमेरिकेतील बेडूक मादी जमिनीवर अंडी घालते आणि नर त्यावर संरक्षक नजर ठेवतो. पिल्ले बाहेर पडण्याची वेळ जवळ आली, की तो एक एक अंडे आपल्या तोंडात घेतो आणि त्यांना ध्वनिकोशाच्या (व्होकल सॅक) पोकळीत ठेवतो. योग्य वेळी पिल्ले तोंडावाटे बाहेर पाण्यात पडतात. ‘इकथीओफिस’ हा अंडय़ांना वेटोळे घालून अंडय़ांचे रक्षण करतो, तर ब्राझिलियन बेडकाची मादी उथळ पाण्यात एक खड्डा तयार करून उपसलेल्या मातीच्या साहाय्याने आतून गुळगुळीत अशी घराची भिंत तयार करते, ज्यामध्ये अंडी आणि पिल्ले सुरक्षित असतात.

– डॉ. नीलिमा कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org