वर्ल्ड  वाइल्डलाइफ फंड (डब्ल्यूडब्ल्यूएफ) या स्वयंसेवी संघटनेने ‘अर्थ अवर’ची संकल्पना मांडली. त्यावर आधारित मोहीम दरवर्षी जगभर राबवली जाते. या मोहिमेअंतर्गत आपण आपल्या परिसरात, रहिवासी संकुलात, वस्तीत, गाव किंवा शहरात, व्यवसायाच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी वर्षांतून एक दिवस हा तास पाळायचा आहे. या तासाभरात आपल्याला शक्य तेवढे विजेवर चालणारे दिवे बंद करायचे आहेत. ही मोहीम दर वर्षी मार्च महिन्याचा शेवटच्या आठवडय़ातील शनिवारी राबवली जाते. त्यानुसार यंदाचा ‘अर्थ अवर’ हा उद्या- शनिवार, २८ मार्च रोजी पाळायचा आहे. या दिवशी सायंकाळी ८.३० ते ९.३० आपण सर्वानी या जागतिक मोहिमेत सहभागी व्हायला हवे.

आजच्या अतिव्यवधानांच्या काळात आपण अनेक गोष्टी स्वत: करायचे विसरू लागलो आहोत. व्यायाम म्हणून काही करू, पण जिने चढून आपण घरात जात नाही. उठून टीव्ही बंद करीत नाही. थोडय़ा अंतरासाठी वाहन शोधतो. उद्वाहन किंवा सरकता जिना शोधतो आणि वापरत राहतो. रात्री घरातले सर्व कोपरे प्रकाशमान करण्याचा प्रयत्न करतो. घरातील टीव्ही समोर प्रेक्षक नसताना चालू असतो. सर्व रस्त्यांवरील दिवे, रेल्वे स्थानक आणि सार्वजनिक ठिकाणचे दिवे, मोठमोठय़ा जाहिरातींचे विजेवर प्रकाशणारे किंवा संगणक संचालित फलक या साऱ्यातून अखंडित वीजप्रवाह वाहत असतो. एकुणात, आपले सर्व जीवन हे वाहणाऱ्या विजेबरोबरच वाहत असते.

मात्र यासाठी सतत आपण नैसर्गिक स्रोतांचा अनिर्बंध वापर करतो. म्हणूनच जागतिक तापमानवाढ, ऊर्जेचा अनिर्बंध वापर यांबद्दल जागरूकता निर्माण करणारा हा ‘अर्थ अवर’ गरजेचा आहे. परंतु तो या समस्यांवरील उपाय नाही. तर हा तास म्हणजे या समस्यांकडे पाहण्याची, त्याविषयीचे चिंतन करण्याची सवड आहे. पृथ्वीबद्दलची कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याची संधी आहे. २००७ साली सर्वप्रथम सिडनी या ऑस्ट्रेलियामधील शहरात हा दिवस ‘दिवे बंद करा दिवस’ म्हणून पाळला गेला. आता तो पृथ्वीवरील तब्बल सात हजार शहरांत आणि १८७ देशांत पाळला जातो. त्यातून विजेच्या वापराबद्दल आणि एकूणच पर्यावरणाबद्दल जनजागृती होते.

नुसत्या तासाभराच्या ‘अर्थ अवर’मधून कार्बन उत्सर्जन किती कमी झाले किंवा किती वीज वाचली, असा विचार यात अध्याहृत नाही. मात्र, स्वत:च्या कार्बन पदचिन्हांचा (कार्बन फूटप्रिंट्स) विचार करून आपण व्यक्तिगत किंवा समूहाने तसेच उद्योजक किंवा सरकार म्हणून विजेच्या उपयोगाबाबत विवेकी विचार करावा ही अपेक्षा आहे. उद्या सायंकाळी ८.३० ते ९.३० हा एक तासभर नको असलेले विजेचे दिवे आणि इतर विजेची उपकरणे बंद ठेवून आपण पर्यावरण संवर्धनाच्या मोठय़ा प्रवाहात सामील होऊ शकतो.

सुरभी वालावलकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org