उन्हाळा सुरू झाला की सगळे कसे रखरखीत वाटू लागते. बाहेर फेरफटका मारताना दोन मिनिटे का होईना, एखाद्या हिरवागार पर्णभार असलेल्या झाडाच्या सावलीत विसावलो की खूप बरे, ताजेतवाने वाटते. मग थोडय़ा वेळाने साहजिकच आपले लक्ष त्या झाडाच्या बुंध्याकडे जाते. वृक्षाचा पसरलेल्या फांद्या आणि पर्णसंभार हा बुंधाच समर्थपणे सांभाळत असतो. ज्याच्या सावलीत आपण विसावलो आहोत ते झाड नेमके कोणते, हे ओळखता आले तर त्या झाडाशी आपले नाते जुळून जाते. परिसरातील झाडांच्या बुंध्यांवर नजर टाकल्यास लक्षात येते की, प्रत्येक प्रजातीच्या खोडावरचा आकृतिबंध (पॅटर्न) हा निराळा असतो.

आंबा, सीताफळ यांच्या खोडांवर आयताकृती संरचना, तर शिरीष, पांगारा यांसारख्यांना नुसत्या रेषा. बारतोंडीच्या खोडावर टेंगळ आलेली दिसतात. पेरू, अर्जुन, निलगिरी यांचे खोड खूपच गुळगुळीत, तर जांभूळ, वावळा असे काहींचे फारच रखरखीत. प्रत्येक खोडाचा रंगसुद्धा वेगवेगळा असतो. कांदोळसारख्या काहींचा पांढरा, हळदूसारख्याचा पिवळा, सप्तपर्णीचा बुंधा ठिपकेदार रखरखीत-राखाडी, तर खैर लालसर काळा. बाभळी, सावर या वृक्षांच्या बुंध्याला संरक्षणार्थ काटे असतात. ताड आणि माड या जातीतल्या झाडांचे बुंधे बघितले, तर त्यांच्या खोडांवर गळलेल्या पानांचे व्रण दिसतात. सुपारीसारख्या खोडावर गोल रिंगा असतात.

काही वृक्षांच्या बुंध्यांची वैशिष्टय़े वर दिली आहेत. आता आपल्या परिसरातील वृक्षांच्या बुंध्यांवरील आकृतिबंध कसा आहे, याविषयी नक्कीच कुतूहल जागे झाले असेल ना? एकदा का टाळेबंदीचे निर्बंध उठले, की सर्वप्रथम चेहऱ्यावर मुखपट्टी (मास्क) बांधून आणि हस्ताच्छादन (ग्लोव्हज्) घालून कोरे कागद आणि क्रेयॉन घेऊन तुमच्या जवळच्या झाडाजवळ जा. तो कागद बुंध्यावर ठेवा आणि क्रेयॉनने त्याच्यावर हलक्या हाताने खरवडायला सुरुवात करा. काही क्षणांत त्या कागदावर छान नक्षी उमटलेली दिसेल. आजूबाजूच्या झाडांचेही असेच ठसे घ्या आणि मग तज्ज्ञांकडून त्या झाडांची माहिती घ्या.

डॉ. मानसी महेश जोशी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org