News Flash

हुकूमशहा फ्रँको

वकील, प्रोफेसर आणि व्यावसायिक लोकांना रेल्वेचे मजूर आणि बांधकाम मजूर म्हणून कामास लावले.

माद्रिदजवळच्या गावात जन्मलेल्या फ्रान्सिस्को फ्रँको याची स्पेनचा हुकूमशहा म्हणून इ.स. १९३९ ते १९७५ अशी झालेली कारकीर्द बरीच खळबळजनक झाली. लष्करी शिक्षण संस्थेत शिक्षण घेतल्यावर लेफ्टनंटपदी नेमणूक होऊन मोरोक्कोतल्या युद्धात त्याला पाठविले गेले. १९३५ साली फ्रँकोची नियुक्ती लष्करप्रमुख (चीफ ऑफ जनरल स्टाफ)पदी झाली आणि त्याला कॅनरी बेटावर काही कामगिरीवर पाठवण्यात आले. स्पेनमध्ये या काळात राजेशाही सरकार जाऊन लोक निर्वाचित सरकार अधिकारावर आले होते. या सरकारला विरोध करणाऱ्या लोकांनी बंडखोरी करून चळवळ उभी केली होती. या चळवळीने उग्र स्वरूप धारण करून देशभरात यादवी युद्ध सुरू झाले. उठावाची तारीखही ठरली. त्या वेळी फ्रँको उत्तर आफ्रिकेत होता. स्पेनचे नाविक दल सरकारला निष्ठावंत होते, त्यामुळे आफ्रिका आणि स्पेनमधील जिब्राल्टरची खाडी पार करून फ्रँकोला माद्रिदला येता येईना, याच दरम्यान हिटलर-मुसोलिनीची युती होऊन दुसरे महायुद्ध होऊ घातले होते. फ्रँकोने हिटलरकडे मदत मागितली. हिटलरने जुंकर ५२ ही लढाऊ विमाने व लष्कर पाठवले. फ्रँकोने या मदतीनिशी १९३६ साली संपूर्ण स्पेनवर कब्जा केला. या काळात त्याला विरोध करणाऱ्या लोकांची त्याने अमानुष कत्तल करून १९३९ ते १९४३ या काळात दोन लाख लोकांना ठार मारले. वकील, प्रोफेसर आणि व्यावसायिक लोकांना रेल्वेचे मजूर आणि बांधकाम मजूर म्हणून कामास लावले.

१९४७ साली फ्रँकोने माद्रिदवर परत नामधारी राजेशाही स्थापन केली. फ्रँकोला स्वत: राजा बनण्याची इच्छा नव्हती, तो स्वत:ला राज्याधिकारी (रीजंट) म्हणवून घेई आणि नेहमी लष्करी गणवेशात असे. राज्यकारभाराची सर्व सूत्रे स्वत:कडे ठेवून फ्रँकोने देशाच्या चलनी नोटा, नाणी आणि तिकिटांवर स्वत:चे छायाचित्र उमटविले होते. दुसऱ्या महायुद्ध काळात हिटलरी छळामुळे हजारो ज्यू रशिया, जर्मनीतून पळून माद्रिदला आले, त्यांना मात्र फ्रँकोने आश्रय देऊन दोन लक्ष ज्यूंचे प्राण वाचवले. कॅथोलिक धर्म, बुलफाइट आणि स्पेनचे नृत्य फ्लॅमेंको यांच्या पुरस्कर्त्यां फ्रँकोचे निधन १९७५ साली झाले.

सुनीत पोतनीस

 

sunitpotnis@rediffmail.com

वृक्ष शेती

उत्पादकास सातत्याने आíथक उत्पन्न देणाऱ्या शेतीस शाश्वत शेती म्हणतात. खरीप आणि रब्बी शेतीवर नेहमीच वातावरण बदल, दुष्काळ आणि पावसाचा प्रभाव आढळतो म्हणून आपल्याकडे आज तरी तिला शाश्वत शेती म्हणणे थोडे धाडसाचे आहे.

फळबाग ही शाश्वत शेती आहे कारण यामध्ये काही निवडक फळझाडांची लागवड उत्पादनासाठी केली जाते. फळांच्या व्यतिरिक्त काही वृक्ष योग्य प्रक्रियेनंतर औषधी पदार्थ, सुगंधी तेल, कागद तसेच उत्कृष्ट प्रकारचे लाकूडसुद्धा देतात. या आणि अशाच प्रकारच्या विविध उत्पादनांसाठी जेव्हा शेकडो वृक्ष समूहात शास्त्रीय पद्धतीने लावले जातात तेव्हा त्यास वृक्षशेती म्हणतात. साग, खैर आणि चंदन हे वृक्षशेतीसाठी उत्कृष्ट वृक्ष आहेत. या शेतीमध्ये नियमित उत्पादनासाठी वृक्षाची निवड करून आणि त्यांची योग्य अंतर ठेवून प्रतिवर्षी लागवड करावी लागते. तसेच  प्राप्त उत्पादनावर आधारित जवळपास असणारा प्रक्रिया उद्योग लक्षात घेणे महत्त्वाचे असते. अशी शेती जास्त शाश्वत असू शकते. वृक्षशेतीमधील पूर्ण वाढ झालेल्या वृक्षावर वातावरण बदल, ओला आणि सुका दुष्काळ या घटकांचा परिणाम होत नाही. मजूर, रासायनिक खते आणि कीटकनाशकांचाही खर्च नसतो. वृक्षशेतीमुळे वातावरणातील कर्बवायूचे प्रमाण झपाटय़ाने कमी होऊन लाकडामध्ये ते घनरूपात साठवले जाते. यालाच आपण कार्बन ठेव असे म्हणतो. साग शेतीमधील प्रत्येक झाड हे शेतकऱ्यास बँक ठेवीसारखे असते. वृक्षशेतीमध्ये शेतकऱ्याने फक्त वृक्षच वाढवणे असे नसून वृक्षांच्या दोन ओळींमध्ये आंतरपीक घेणेसुद्धा अपेक्षित असते. वृक्षशेतीस प्रोत्साहन म्हणजे जंगल ोत्र वाढवणे. आज आपल्या देशासमोर पर्यावरणाच्या अनेक समस्या आहेत. यामध्ये पावसाचे घटते प्रमाण, हरवलेले भूजल, वाढता कर्बवायू यांचाही उल्लेख करावाच लागेल आणि यावर हमखास उपाय म्हणजे वृक्षशेती.

वृक्षशेतीमुळे हवेत आद्र्रता वाढून पावसाळ्यामध्ये ढगनिर्मितीसाठी मदत होते, उन्हाळ्यात वातावरण थंडसुद्धा राहते. शासनातर्फे वृक्षारोपणाची मोहीम प्रतिवर्षी राबवली जाते. या मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या काही भागांवर वृक्षशेतीस प्रोत्साहन देऊन त्यावर आधारित ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योग उभारले गेले तर रोजगारनिर्मिती आणि पर्यावरणाची सेवा अगदी सहज घडू शकते.

डॉ. नागेश टेकाळे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2016 3:43 am

Web Title: dictator franco
Next Stories
1  ‘बुलफाइट’चा तपशील
2 माद्रिदची बुलफाइट
3 उत्सवप्रिय माद्रिद
Just Now!
X