डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com

‘मिरर- न्युरॉन सिस्टीम’ची प्रथम जाणीव माकडाच्या मेंदूवरील संशोधन करताना झाली. एखादी कृती प्रत्यक्ष करीत मेंदूतील ज्या पेशी सक्रिय होतात, त्याच पेशी प्रत्यक्ष ती कृती करीत नसतानाही केवळ ती पाहिल्याने त्याचे प्रतिबिंब म्हणूनही सक्रिय होतात. म्हणूनच मेंदूतील या पेशींना ‘मिरर-न्युरॉन’ असे नाव मिळाले. या पेशी माणसाच्या मेंदूतही असतात हे नंतर सिद्ध झाले. मेंदूतील निरनिराळ्या भागांत अशा पेशींचे जाळेच असते. मेंदूतील वाचा केंद्राशी संबंधित भागात त्या मोठय़ा प्रमाणात असतात. त्या बोलण्यास शिकण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचे कार्य करीत असतात. आपले पहिले बोल आपण आईचे  अनुकरण करीतच शिकत असतो, ते या ‘मिरर-न्युरॉन’मुळेच. आपण चार-पाच जण गप्पा मारत बसलेलो असताना एकाला जांभई आली की सर्वानाच जांभया येऊ लागतात तेदेखील ‘मिरर-न्युरॉन्स’मुळेच. मेंदूतील ‘न्युरॉन्स’  वेगवेगळी कामे करतात. काही माहिती घेतात, काही कृती करण्यास लावणारे असतात; त्यांना ‘मोटर न्युरॉन्स’ म्हणतात. ‘मिरर-न्युरॉन्स’ मात्र ही दोन्ही कामे करतात. ते माहिती घेताना आणि तशीच कृती करताना सक्रिय असतात. सिनेमातील नायिका रडू लागली की प्रेक्षकांतील अनेक जण हुंदके देऊ लागतात किंवा क्रिकेट सामना पाहताना प्रतिस्पर्धी संघाची विकेट पडली की मैदानातील खेळाडूंसह टीव्हीवर ते पाहणारेही जोरात ओरडतात, उडय़ा मारतात. हे सारे या ‘मिरर-न्युरॉन्स’मुळेच घडते. अर्थातच, समोरील व्यक्तीच्या भावना समजून घेणे, समानुभूती हे यांचेच कार्य आहे. ‘अमीग्डला’ या भावनांशी संबंधित भागात बरेच ‘मिरर-न्युरॉन्स’ असतात. मानवी मेंदू  दुसऱ्याच्या केवळ भावनाच समजून घेत नाही, तर वेदनाही समजून घेतो. एखाद्या व्यक्तीला वेदना होत असतात तेव्हा तिच्या मेंदूतील ‘अमीग्डला’ आणि ‘इन्सूला’मधील ‘न्युरॉन्स’ अधिक सक्रिय असतात. दुसऱ्या व्यक्तीच्या वेदना पाहिल्याने दु:ख झाले, भावनिक वेदना झाल्या तरीही मेंदूतील तो भाग सक्रिय होतो. माणूस दुसऱ्याच्या वेदना घेऊ शकत नाही, पण अनुभवू शकतो. मात्र या भागाची संवेदनशीलता अधिक असेल, तर माणूस खूपच हळवा होतो; दुसऱ्याचे दु:ख कमी करण्याचे प्रयत्न करण्याऐवजी स्वत:च अधिक दु:खी होतो. असे असले तरी व्यक्तीचे अन्य व्यक्तींशी नाते ‘मिरर-न्युरॉन्स’मुळेच शक्य होते. असे नाते निर्माण होणे मेंदूच्या विकासासाठी आणि स्वास्थ्यासाठीही आवश्यक आहे.