28 September 2020

News Flash

‘रेडार’चा उपयोग

मानव  हे  तंत्र फार  उशिरा म्हणजे सुमारे  ऐंशी वर्षांपूर्वी शिकला.

कोटय़वधी वर्षांपासून डॉल्फिन, व्हेल यांच्यासारखे जलचर, चिचुंद्रीच्या जातीतले भूचर आणि वटवाघळे हे सस्तन प्राणी तसेच काही प्रजातींचे पक्षी भक्ष्य शोधण्यासाठी आणि मार्गातले अडथळे ओळखण्यासाठी ‘एको-लोकेशन’ या तंत्राचा उपयोग करीत आले आहेत. एको-लोकेशन म्हणजे प्रतिध्वनींचा वापर करून एखाद्या अडथळ्याचे अस्तित्व ओळखणे (डिटेक्शन) आणि त्याचे अंतर मोजणे (रेंजिंग).  यासाठी ते ध्वनिलहरींचा उपयोग करतात.

मानव  हे  तंत्र फार  उशिरा म्हणजे सुमारे  ऐंशी वर्षांपूर्वी शिकला. ‘एको साउंडर’च्या मदतीने ध्वनिलहरींचा उपयोग करून समुद्राची खोली मोजणं आणि  ‘रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग (रेडार)’ द्वारे विद्युत्चुंबकीय लहरींचा वापर करून अंतरं मोजणं ही ती दोन तंत्रं!

दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला रेडारचा वापर प्रथमत: शत्रूच्या विमानांची चाहूल घेण्यासाठी केला गेला. आज हवामान, नौवहन, हवाई आणि भूस्तरीय वाहतूक, तसेच  खगोलशास्त्रासारख्या विविध क्षेत्रांमध्ये रेडारचा वापर अत्यावश्यक ठरतो आहे.

रेडारमध्ये वेगवेगळ्या तरंगलांबीच्या सूक्ष्म लहरी (मायक्रो वेव्हज) वापरल्या जातात. यामध्ये समुद्रावर वापरली जाणारी रेडार यंत्रणा ३ सें. मी. (एक्स बँड) आणि १० सें. मी. (एस बँड) या दोन लहरींचा उपयोग करून घेते.  जहाजाच्या रेडारची अँटेना सतत फिरत असते आणि ती या लहरी सर्व दिशांना प्रक्षेपित करते. त्यांच्या मार्गात दुसरे  जहाज, होडी, खडक, जमीन असा काही अडथळा आला तर त्यावरून या लहरी परावíतत होतात आणि तीच अ‍ॅन्टेना त्या परत घेते.

विद्युतचुंबकीय लहरींचा वेग सेकंदाला ३,००,००० कि.मी., अर्थात एका मायक्रोसेकंदामध्ये तीन किलोमीटर इतका असल्यामुळे हे काम काही मायक्रोसेकंदांमध्ये होते. या मायक्रोसेकंदांचा अचूक हिशेब केल्याने अंतर मोजता येते.

जुन्या प्रकारच्या रेडारमध्ये हे अंतर एका छोटय़ा पडद्यावर (‘कॅथोड रे टय़ूब’ वर)  एका रेघेच्या स्वरूपात दिसत असे. आधुनिक रेडारमध्ये या सर्व परावíतत लहरींच्या मदतीने एक रंगीत संयुक्त चित्र (कॉम्पोझिट  पिक्चर) बनवले जाते आणि ते संगणकीय पडद्यावर दिसते. यामुळे ४८ सागरी मल (सुमारे ९० कि.मी.) अंतरापर्यंतचा भूभाग आणि जहाजे इत्यादि. नकाशाच्या स्वरूपात दिसू शकतात आणि जहाजे दाट धुक्यामध्येसुद्धा निर्धोकपणे संचार करू शकतात.

– सुनील सुळे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

अली सरदार जाफ़री  (१९९७)

भारतीय ज्ञानपीठातर्फे दिला जाणारा १९९७ चा ज्ञानपीठ पुरस्कार सुप्रसिद्ध उर्दू कवी, चित्रपट गीतकार, लेखक, संपादक, समीक्षक, पत्रकार आणि दूरदर्शनचे निर्माता, अली सरदार जाफ़री यांना १९७७-१९९६ या काळातील भारतीय साहित्यातील उर्दू साहित्याच्या योगदानासाठी प्रदान करण्यात आला.

उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्य़ातील, बलरामपूर या गावी एका खानदानी कुटुंबात २९ नोव्हेंबर १९१३ रोजी अली सरदार जाफ़री यांचा जन्म झाला. उर्दू माध्यमातून शालेय शिक्षण झाल्यावर दिल्ली विद्यापीठाच्या झाकीर हुसेन कॉलेजमधून १९३८ मध्ये त्यांनी बी.ए.ची पदवी संपादन केली. मार्क्‍सवादाच्या प्रभावामुळे विद्यार्थी जीवनात साम्राज्यवादविरोधी आंदोलनात, तसेच सामाजिक, साहित्यिक आंदोलनांत त्यांचा वेळोवेळी सहभाग असे. इंडियन नॅशनल काँग्रेसतर्फे विद्यापीठ विद्यार्थी युनियनचे सेक्रेटरी म्हणून राजकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने इंग्रजांविरुद्ध क्रांतिकारी काव्यलेखन केल्याबद्दल डिसेंबर १९४० मध्ये त्यांना अटक करून तुरुंगात ठेवण्यात आले. त्यामुळे लखनऊ विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असूनही ते एम.ए.ची परीक्षा देऊ शकले नाहीत.

१९३६ मध्ये लखनऊ येथे पहिल्यांदाच भरलेल्या पुरोगामी लेखक चळवळीचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते आणि या लेखक चळवळीला वाहिलेल्या ‘नया अदब’ या साहित्यिक पत्रिकेचे १९३९ ते १९४९ पर्यंत ते सहसंपादक होते. उर्दूतील आघाडीचे मासिक ‘गु़फ्तगू’चेही ते संपादक आणि प्रकाशक होते.

उर्दू आणि इंग्रजीचे उत्तम वक्ते असलेल्या जाफ़री यांना २० जानेवारी १९४९ रोजी भिवंडीत पुरोगामी उर्दू लेखक परिषदेचे आयोजन केल्याबद्दल अटक झाली. तत्कालीन ‘मुंबई’चे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी त्यांना ताकीद दिली होती. पण नंतर पुन्हा तीन महिन्यांनी त्यांना अटक करण्यात आली. राजकीय, सामाजिक चळवळीतील सहभागाबरोबरच त्यांचे काव्यलेखनही सुरू होते. १९४३ मध्ये त्यांचा पहिला काव्यसंग्रह ‘परवाज’ (भरारी) प्रकाशित झाला. त्याअगोदर १९३८ मध्ये त्यांचा पहिला कथासंग्रह ‘मंझिल’ प्रकाशित झाला होता. याशिवाय दोन नाटके, एक आत्मकथन, समीक्षा, संपादन सुरूच होते. गतशतकातील शायरांच्या जीवनकार्यावरील ‘कहकशां’ (१८ भाग) आणि ‘महफिल ए यारां’ हे त्यांचे दूरदर्शनवरील कार्यक्रम गाजले.

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2017 2:59 am

Web Title: what is radio detection and ranging
Next Stories
1 कुतूहल : हायपरबोलिक नॅव्हिगेशन
2 ख्रिश्चन डॉपलर
3 सोळा मिकी
Just Now!
X