प्रवाळद्वीपांचा विषय निघाला की ऑस्ट्रेलियातील ग्रेट बॅरीयर रीफ, अंदमान निकोबार, लक्षद्वीप यांची आठवण येते. पण महाराष्ट्रात विजयदुर्ग किल्ल्याच्या पश्चिमेला १०५ किलोमीटरवर असलेले आंग्रिया बँक प्रवाळद्वीप अजूनही प्रसिद्धीपासून अज्ञात  आहे. मराठा आरमाराचे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या सन्मानार्थ या बेटास आंग्रिया बँक नाव मिळाले आहे. भारतातील बाकी प्रवाळबेटे मुख्यत्वे किनाऱ्यालगत आहेत, परंतु आंग्रिया बँक हे खुल्या समुद्रातील पठारी भूभागावर आहे. कमीत कमी २४ मीटर तर जास्तीत जास्त ४०० मीटर खोलीवर असणारा हा भूभाग सागरी ओहोटीच्या वेळी कधी कधी पाण्याबाहेर डोकावतो. सूर्यप्रकाश, अन्न आणि वाढीसाठी सुयोग्य वातावरण असल्यामुळे हे कंकणाकृती प्रवाळबेट जैवविविधतेचे आगर आहे.

२०१५ मध्ये राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान आणि २०१९ मध्ये वन्यजीव संधारण संस्था, पर्यटन विकास मंडळ  आणि सागरी जीवसंपदा आणि पर्यावरणशास्त्र केंद्र या संस्थांनी मिळून आखलेल्या अभ्यास मोहिमांमुळे आंग्रिया बँकबद्दल अधिकाधिक माहिती समोर आली आहे. स्कूबा डाइव्ह करून आंग्रिया बँकचा शोध घेणाऱ्या अभ्यासगटाला या ठिकाणी बहुविध मासे दिसले. इतरत्र सहज न दिसणारे मुरे ईल, कोरल रे, व्हिप रे आणि इगल रे या ठिकाणी दिसले. हिंदी महासागरात आढळणारे बॉटलनोज डॉल्फिन्स, हम्पबॅक डॉल्फिन, स्पिनर डॉल्फिन, अत्यंत दुर्मीळ शॉर्टफीन पायलट व्हेल येथे दिसून आले. १११ कुळांतील प्रवाळांच्या एक हजार २८६ प्रजाती, रीफ माशांच्या १७२ प्रजाती येथे आढळल्या. १९ प्रजातींच्या अपृष्ठवंशीय प्राण्यांची नोंद करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आश्चर्य म्हणजे इथे आढळणाऱ्या १५० पेक्षा जास्त प्रवाळ आणि शैवालांच्या जाती अद्याप तापमानवाढ आणि प्रदूषणामुळे होणाऱ्या आम्लीकरणाच्या धोक्यापासून सुरक्षित आहेत. मात्र नैसर्गिक वायू आणि तेलासाठी होणारे उत्खनन तसेच मासेमारी यामुळे या परिसंस्थेला धोका संभवतो. अनेक माशांचे जन्मस्थान असणाऱ्या परिसंस्थेस धोका निर्माण झाल्यास मासेमारीसुद्धा धोक्यात येऊ शकते. महाराष्ट्र सरकारने २०११ चौरस किलोमीटर क्षेत्रावरील आंग्रिया बँक हे संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. केंद्र सरकारची मान्यता मिळाल्यास हे विशेष आर्थिक क्षेत्रांमधील प्रथम संरक्षित क्षेत्र ठरेल. सरकारी पाठिंबा आणि लोकसहभागाने हा अद्वितीय वारसा आपण जपू याची खात्री वाटते.- रेणू भालेराव,मराठी विज्ञान परिषद