गणितात प्राध्यापकी करणाऱ्या वडिलांमुळे लहानपणीच गणिताशी मैत्री झालेले श्रीराम अभ्यंकर २२ जुलै १९३० रोजी उज्जैनमध्ये जन्मले. कुठेही आणि केव्हाही गणिते करता यावीत म्हणून ते घरभर जागोजागी पेन्सिली लपवून ठेवत. जन्मजात तीव्र बुद्धिमत्तेमुळे अभ्यासात ते नेहमीच आपल्या सहाध्यायींच्या पुढे असत. न्यूटन, गॅल्वा, जॅकोबी यांना आदर्श मानणाऱ्या अभ्यंकरांनी भौतिकशास्त्रातील पदवी घेण्यासाठी मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्रवेश घेतला, मात्र प्रत्यक्षात मान्यवरांशी चर्चा करून मुंबई विद्यापीठातून गणितात पदवी मिळवली (१९५१). नंतर गणितातील एम.ए. पदवी अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातून (१९५२), तर पीएच.डी. पदवी (१९५५), नामवंत गणिती ऑस्कर झरायस्कींच्या मार्गदर्शनाखाली मिळवली.

पृष्ठभागावरील ज्या बिंदूसाठी गणितीय फलाची किंवा समीकरणाची किंमत अव्याख्यात असते, त्या बिंदूला संविशेषता (सिंग्युलॅरिटी) म्हणतात. समजा, एखाद्या पृष्ठभागावरील बिंदू, वास्तव फल फ(क्ष) = १/क्ष वापरून दाखवता येत असतील तर त्यात ‘क्ष’ शून्य असताना संविशेषता मिळते. कारण, १/० अव्याख्यात आहे. झरायस्कींनी द्विमित किंवा पृथ्वीसारख्या बंदिस्त गोलाकार, त्रिमित पृष्ठभागावरील शून्य किमतीसाठीच्या संविशेषता सिद्धतेसह शोधल्या होत्या. परंतु क्लेनच्या बाटलीसारख्या काही वस्तूंचे पृष्ठभाग त्रिमितीत न बसणारे असल्यामुळे द्विमित आकृतीत वापरता येणारे बिंदूदर्शक सदिश लंब तिथे वापरता येत नाहीत. झरायस्कींनी पीएचडीसाठी सुचवलेली ही समस्या तहानभूक विसरत अथक प्रयत्नांती अभ्यंकरांनी सोडवली! क्लेनच्या बाटलीसारख्या अन्त:स्थापित (एम्बेडेड) पृष्ठभागांसाठी ‘वेळ’ या चौथ्या मितीचा आधार घेत संविशेषता शोधण्यासाठी त्यांनी जी जटिल परंतु शक्तिशाली उकल प्रबंधातून मांडली, ती युगप्रवर्तक ठरली आणि अभ्यंकर जगद्विख्यात झाले.

 अल्जिब्रिक सर्फेसेस, फंडामेंटल ग्रुप्स, जॅकोबियन प्रॉब्लेम यांवर संशोधन करतानाच अभ्यंकरांनी अमेरिकेतील कोलंबिया, कॉर्नेल, प्रिन्स्टन, हॉपकिन्स, पड्र्यू विद्यापीठांत तसेच अनेक देशांमध्येही नियमित किंवा अभ्यागत  प्राध्यापक म्हणून काम केले. ‘हिस्टॉरिकल रँबलिंग्ज इन अल्जिब्रिक जॉमेट्री अँड रिलेटेड अल्जिब्रा’ या शोधनिबंधातून त्यांनी भारतीय गणितींच्या कार्याचा गौरवपूर्ण ऊहापोह केला आहे. पड्र्यू विद्यापीठातील कार्यकाळातही ते पुणे विद्यापीठाच्या गणित-विभागाचे प्रमुख होते. त्यांच्या कल्पनेतून १९७६ मध्ये साकारलेली ‘भास्कराचार्य प्रतिष्ठान’ ही पुण्यातील संस्था भारताला जागतिक पटलावर नेणारे गणितज्ञ घडवीत आहे. अनेक सन्मान मिळवलेल्या अभ्यंकरांचे कार्य नोबेल पुरस्काराच्या तोडीचे असल्याचा निर्वाळा जगभरातील नामवंत गणितींनी दिला आहे. २ नोव्हेंबर २०१२ रोजी इहलोक सोडणाऱ्या या प्रज्ञावंताला स्मरणांजली! – डॉ. विद्या ना. वाडदेकर मराठी विज्ञान परिषद,  वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org   

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.