कविजनांनी आपल्या हृदयाला भावनांचं, खासकरून प्रेमाचं अधिष्ठान ठरवलं आहे. शरीरस्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून मात्र हृदय हा एक स्नायूंचा बनलेला पंप आहे. शरीरभर फिरून आलेलं अशुद्ध रक्त फुप्फुसांकडे धाडून देणं आणि त्यांच्याकडून आलेलं शुद्ध रक्त शरीरभर खेळवणं हे त्याचं एकमेव काम. त्यासाठी डाव्या बाजूच्या खालच्या कप्प्यामधून, जवनिकेकडून, महाधमनीत जोराने रक्त फेकलं जाण्याची गरज असते. पण काही कारणांनी हा पंप दुर्बळ झाला तर तो ही कामगिरी नीट पार पाडू शकत नाही. महाधमनीतच जर कमी रक्त आलं तर शरीरभर तर ते कसं पुरवता येणार? याच स्थितीला डॉक्टर हार्ट फेल्युअर म्हणतात. त्याचं निदान वेळेवर झालं तर योग्य ते उपचार करून जीव वाचवता येतात. पण ते उपचार करणं तर सोडाच पण त्या व्याधीचं अचूक निदान करणारी सुविधा फॅमिली डॉक्टरांकडे नसते, याची जाणीव होऊन लंडनच्या इम्पिरियल कॉलेजनं ती क्षमता त्यांना देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेतली आहे. त्याकरिता त्यांनी ट्रायकॉर्डर नावाची संगणक आज्ञावली तयार केली आहे.
हेही वाचा : कुतूहल : पाहा, निवडा, फवारा!
सर्वसामान्यत: डॉक्टर रुग्णाची प्राथमिक तपासणी स्टेथोस्कोपच्या साहाय्यानेच करतात. त्यालाच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अल्गोरिदमची जोड देऊन ट्रायकॉर्डर प्रणाली कार्यान्वित केली गेली आहे. त्याची चाचणी घेतली असता हृदय अशक्त झालं आहे की काय याचं निदान वेळीच करण्यात ती यशस्वी झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. या प्रणालीची संवेदनक्षमता ९१ टक्के आणि अचूकता ८८ टक्के असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे ग्रामीण भागातही परिस्थिती गंभीर होण्याआधीच या व्याधीचं निदान झाल्यामुळे ती माहिती मोठ्या रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांना देऊन त्या रुग्णावर करायच्या प्राथमिक उपचारांची माहिती मिळवली जाते. वेळीच ते प्राथमिक उपचार करून रुग्णाला मोठ्या रुग्णालयात दाखल करणं शक्य झालं आहे. त्यातून त्यांच्या हृदयाची रक्त खेळवण्याची शक्ती लक्षणीयरीत्या वाढून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण उंचावलं आहे. रुग्ण आपली सामान्य जीवनशैली पुनश्च अंगीकारण्यास सक्षम होत आहेत.
डॉ. बाळ फोंडके
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org