30 October 2020

News Flash

नव्या कौशल्यांचे नवे रोजगार

चौकशीसाठी, तक्रार करण्यासाठी आज आपण माणसांशी बोलतो..

|| हृषिकेश दत्ताराम शेर्लेकर

चौकशीसाठी, तक्रार करण्यासाठी आज आपण माणसांशी बोलतो.. आणखी काही वर्षांत ही कामं नक्कीच कृत्रिम प्रज्ञेच्या उपयोजनांमुळे, आपल्या मोबाइलवरून होतील.. पण मग अशी अनेक कामं करणारी माणसं कुठे जातील? नर्स, सेल्ममन यांचीही आवश्यकता कमी होईल का? त्या स्थितीला तोंड कसं द्यायचं, याची ही चर्चा..

कृत्रिम बुद्धिमत्तेचे किंवा ‘नवप्रज्ञे’चे भविष्यातील रोजगारांवर होणारे एकंदरीत परिणाम व ठळक सल्ले यांची चर्चा गेल्या आठवडय़ात, ‘कोण तगतील आणि कसे?’ या लेखातून केली. आज तिथून पुढे विविध व्यवसाय, भविष्यातील परिणाम आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपयोजनांपुढे यशस्वी होण्यासाठी आत्ताच करायचे बदल व संधी यांबद्दल. आजच्या लेखाची मांडणी ही प्रामुख्याने ‘विविध व्यवसाय > भविष्यातील परिणाम > यशस्वी होण्यासाठी आत्ताच करायचे बदल / संधी’ अशीच राहील. आधीच नमूद करतो की, आपण २०३०-४० सालची गोष्ट करतो आहोत.. म्हणजे ही चर्चा आताच्या लहान, तरुण पिढीला जास्तीतजास्त उपयुक्त ठरावी, असा प्रयत्न आहे.

त्यापूर्वी एका मजेदार संशोधनाबद्दल. जगातील सरासरी घरगुती खर्चाचे विविध गट वि. मागील २५ वर्षांतील किमती यांच्यातील चढ-उतार एका आलेखात मांडले गेले. उदाहरणार्थ अन्नधान्य, औषधे, प्रवास, मुलांचे शिक्षण, घरगुती उपकरणे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, इत्यादी. त्यात टक्केवारीप्रमाणे लोक सर्वात जास्त खर्च करताहेत शिक्षण, वैद्यकीय सेवा व करमणूक (हॉटेलिंग, सिनेमा, पर्यटन) मिळवण्यात. गंमत म्हणजे डॉक्टर, वकील, शाळा, तारांकित हॉटेलं, मद्य, सहली इथे कधी आपण घासाघीस करतो का? पण तेच फ्रिज, गाडी आणि साधे कपडेसुद्धा घेताना तीच व्यक्ती एकदम अधिकारवाणीने ‘सवलत’ मागते. थोडक्यात काय, तर ज्या तीन क्षेत्रांना ‘ग्रीन-फील्ड’ व्यवसाय म्हणतात, ते कधीच मंदीची झळ न पोहोचणारे.. कारण भावनेचं विश्व आहे ना तिथे!

ही गमतीची गोष्ट इथेच सोडून (पण लक्षात ठेवून), आपण चर्चेला थेट सुरुवात करू :

(१) अकुशल व कुशल कामगार (शारीरिक मेहनतीचे रोजगार) :

परिणाम : औद्योगिक यांत्रिकीकरणामुळे आधीच इथे मनुष्यबळ कमी लागते आहे, त्यात रोबोटिक यांत्रिकीकरणामुळे जी कामे सध्या मनुष्यबळ वापरून केली जाताहेत तीदेखील हळूहळू नष्ट होतील.

संधी, बदल : यंत्र-चालक, मशीन-ऑपरेटर वा उच्च कौशल्य आत्मसात करणे.

(२) कारकुनी रोजगार (उदा. : प्रशासकीय, बॅक-ऑफिस, ग्राहकसेवा कर्मचारी) :

परिणाम : सुरुवातीचे संगणकीकरण, मागील दशकातले डिजिटलयुग, सध्याचे रोबोटिक-प्रोसेस ऑटोमेशन व पुढची पायरी म्हणजे चॅट, व्हॉइस-बॉट वापरून ग्राहक संवाद आणि एनएलपी वापरून कागदपत्रे यांत्रिक पद्धतीने हाताळली जात आहेत. त्यामुळे हा प्रांत सर्वाधिक धोक्याचा. कारकुनी नोकऱ्या भविष्यात अजिबातच उरणार नाहीत असा अनेकांचा अंदाज आहे.

संधी, बदल : आहात त्याच क्षेत्रात ट्रेनिंग घेऊन अधिकारीपद; किंवा सेल्स, मार्केटिंग, एचआरमध्ये ट्रान्सफर. सर्वोत्तम म्हणजे आपल्या व्यावहारिक ज्ञानाचा वापर करून एआय ऑटोमेशन प्रकल्पात समाविष्ट होणे. उदा: फायनॅन्स कर्मचारी वित्तशाखेतील ऑटोमेशन प्रकल्पात सल्लागार, इथे टेक्निकल अनुभवाची अजिबात गरज नसते.

(३) क्षेत्र-तंत्रज्ञ (उदा : टेलिकॉम फील्ड टेक्निशियन):

परिणाम : हल्ली आयओटी तंत्रज्ञानामुळे सगळी उपकरणे ‘कनेक्टेड’ होताहेत, त्यामुळे काहीही तांत्रिक बिघाड झाल्यास, नवीन सेवा द्यायची असल्यास दूरस्थ नियंत्रण-कक्षातूनच इंटेरनेटद्वारा सर्व नियंत्रित करता येते. उपकरण हार्डवेअर खराब झाल्यास कुरिअरद्वारा परत वगरे. मग फील्ड टेक्निशियन काय करणार? खरे म्हणजे मानवी नियंत्रण कक्षदेखील ऑटोमेट होतील.

संधी, बदल : घरगुती उपकरणे सोडून क्लिष्ट औद्योगिक उपकरणांकडे वळणे किंवा सर्वोत्तम म्हणजे आयओटी टेक्निशियन बनणे.

(४) सेल्स, मार्केटिंग कर्मचारी (उदा : औषधकंपन्यांचे प्रतिनिधी, फील्ड-सेल्स, रीटेल-सेल्स) :

परिणाम : विक्री महसूल भागिले व्यवहार संख्येवर ठरेल मानवी कर्मचारी वि. रोबोटिक ऑटोमेशन. उदा : बँकेच्या छोटय़ा कर्ज विक्रीसाठी रोबॉट, तर मोठी रक्कम, क्लिष्ट अटी व खास ग्राहकांसाठी पर्सनल सेल्स एजंट.

संधी, बदल : कंपनी-ते-ग्राहक सेल्सकडून कंपनी-ते-कंपनी सेल्स किंवा (३)प्रमाणे ऑटोमेशन प्रकल्पात सल्लागार.

(५) डॉक्टर, पॅरा-मेडिकल, नìसग, हॉस्पिटल कर्मचारी, वैद्यकीय उपकरणे हाताळणारे तंत्रज्ञ :

परिणाम : हॉस्पिटल कर्मचारी, वैद्यकीय टेक्निशियन, नर्स वगरे कामे  सध्या पूर्णपणे मनुष्यबळ वापरून केली जातात तीदेखील मनुष्य + मशीन अशा स्वरूपात होतील.  उदा : नर्स देखरेख ठेवतात, रीिडग घेतात, लिहून दिलेली औषधे देतात व आयव्ही इंजेक्शन वगरे. यातील पहिली तीन काय्रे तर आताच स्वयंचलित पद्धतीने होऊ शकतात. तसेच रोबोटिक सर्जरी भारतात आजही उपलब्ध आहे, आणखी पाच-दहा वर्षांत त्याचा झपाटय़ाने प्रसार होईल असे वाटते. पण प्रत्यक्ष डॉक्टर? आयबीएम वॉटसनने जगातील पहिली ‘एआय बेस्ड’ वैद्यकीय निदान प्रणाली विकसित केली आहे. थोडक्यात, इथे एक रोबोटिक सॉफ्टवेअर रुग्णाने सांगितलेलं वर्णन, रक्तचाचण्या आणि आयबीएमचा अजस्र हेल्थ डेटाबेस वापरून सर्वात योग्य उपचार पद्धती सुचविते, तेदेखील अशा आजाराबद्दलच्या जागतिक माहितीसकट. पुढे जाऊन एकटेदुकटे वरिष्ठ डॉक्टर अशा रोबोटिक असिस्टंटचा वापर खुबीने करतील. पेशंट अगदी दुसऱ्या शहरात असला तरी. सध्या आयबीएमने कॅन्सर निदानावर भर दिलाय म्हणा; तरीही तज्ज्ञांच्या मते १०-१५ वर्षांनंतर ‘ज्युनियर डॉक्टर’ या पेशामधील मागणी हळूहळू कमी कमी होईल.

संधी, बदल : प्रत्येकाने मनुष्य + मशीन मिळून नवीन कार्यपद्धती शिकणे हे ओघाने आलेच. डिजिटल तंत्रज्ञान व हाय-स्पीड इंटरनेट वापरून दूरस्थ गावात, शहरात व्यवसायाची वृद्धी. किंवा रोबोटिक हेल्थ प्रकल्पात सल्लागार. नर्स, पॅरा-मेडिकल इत्यादींनी नेहमीच्या कामाव्यतिरिक्त पेशंटशी संवाद, कौन्सेलिंग या कौशल्यांवर भर देणे.

(६) वकील व न्यायालय कर्मचारी :

परिणाम : सध्याचे रोबोटिक-प्रोसेस-ऑटोमेशन व पुढची पायरी म्हणजे चॅट, वॉइस-बॉट वापरून मानवी संवाद आणि एनएलपी वापरून कागदपत्रे यांत्रिक पद्धतीने हाताळली जाताहेत त्यामुळे कर्मचारी या नोकऱ्या भविष्यात अजिबातच उरणार नाहीत असा अनेकांचा अंदाज आहे. वकिलांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, डॉक्टरचे उदाहरण इथेही तंतोतंत बसते. आयबीएम वॉटसन व इतरांनी करोडो केस-कागदपत्रे-निकालांचा डेटाबेस, त्यावर मशीन लìनग आणि सर्च करताच शिफारस, यशाचा दर अशी उपयुक्त माहिती प्रयोगिक तत्त्वावर देणे सुरू केले आहे. केस-पेपरची नोंद करणे, नवीन कायदेशीर ड्राफ्ट बनविणे ही सर्व कामे कन्टेंट-बॉट आजही सहजच करू शकतात.

संधी, बदल : (५) प्रमाणे वरील सर्व लागू.

पुढील लेखात बघू उर्वरित व्यवसायांबद्दल म्हणजे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पत्रकार,  कलाकार व क्रीडापटू, पर्यटन/हॉटेल व्यवसाय, अभियांत्रिकी (आयटी तसेच स्थापत्य, उत्पादन), मोटर/हवाई/जहाज चालक व निगडित व्यवसाय, व्यावसायिक सल्लागार (उदा : चार्टर्ड अकाउंटंट), सुरक्षारक्षक, उच्चपदस्थ अधिकारी वर्ग, उद्योजक, संशोधक व शास्त्रज्ञ, विचारवंत, पुढारी इत्यादी.

‘भारतात हे सगळं शक्य आहे का, आपण अजून बरेच मागे आहोत, इकडे नाही बुवा मशीन-बिशीन चालणार, आपल्याकडे लोकसंख्या केवढी, त्याच काय, हे तंत्रज्ञान आपल्याला परवडेल काय?’ वगरे प्रश्न मला नेहमीच विचारले जातात. खरेतर माझ्याकडेही कुठलंही ठोस असं उत्तर नाही की आणखी २५ वर्षांनंतर भारत कसा असेल.  पण १९९५ मध्ये मोबाइल फोन आपल्या देशात पहिल्यांदा आले तेव्हा प्रतिमिनिट १६ रुपये मोजावे लागत, ती किंमत आज २४ वर्षांनी जवळपास मोफतच झाली आहे. याच टेलिकॉम क्रांतीमुळे कित्येक नवीन व्यवसाय, रोजगार निर्माण झाले आहेत, ज्यांची त्या काळी कोणी कल्पनाही केली नसेल. त्याच नसíगक चक्रानुसार जुने रोजगार हळूहळू बंद होणारच, पण त्याहूनही जास्त नवीन व्यवसाय नक्की निर्माण होतील. नासकॉमच्या अवाहलाप्रमाणे भविष्यातले ४६ टक्के रोजगार आजच्यापेक्षा पूर्णपणे वेगळ्या प्रकारचे, नवीन कौशल्याचे असतील.

लेखक टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसमध्ये साहाय्यक उपाध्यक्ष आणि सध्या अ‍ॅनालिटिक्स आणि इनसाइट्सच्या यूएसए सेंटरचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

hrishikesh.sherlekar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2019 12:06 am

Web Title: artificial intelligence 11
Next Stories
1 कोण तगतील आणि कसे?
2 कृत्रिम प्रज्ञा आणि भारतातील संधी
3 ई-पहारेकऱ्याची उपयुक्तता
Just Now!
X