बोईसर : पालघर जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात काळाबाजार होत असल्याचे भिवंडी पोलिसांनी नुकताच युरियाचा १०० टन साठा जप्त केल्याच्या कारवाईतून निष्पन्न झाले आहे. दोन महिन्यांतील ही सलग दुसरी कारवाई आहे. या गोरखधंद्यात सामील संशयित हे पालघर जिल्ह्यातील असल्याचे दिसून आले असून युरिया माफियांचे भिवंडी हे प्रमुख केंद्र असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे जिल्ह्यात मंगळवारी २५ टन अनुदानित युरिया वाहून नेणारा एक ट्रक पकडल्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गोडाऊन असलेल्या ७५ टन युरियाचा साठा जप्त करण्यात आला. दीड महिन्यापूर्वीही अशीच कारवाई करण्यात आली होती. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, डहाणू, वाणगाव, चिंचणी, सफाळे, बोईसर, धुंदलवाडी, तलासरी, कासा, केळवे, कुडूस, खाणिवली, कँचाड, पाचमाड, मलवाडा, तलावाडा, मोखाडा, खोडाळा, जामसर, सायवण, आशागड आणि वाडा येथील कृषी सेवा केंद्रांच्या नावाने खरेदी केलेला हजारो टन अनुदानित निम कोटेड युरिया प्रत्यक्षात शेतकऱ्यांना वाटप न होता गोदामांमध्ये त्याच्या गोण्या आणि पॅकिंग बदलून तारापूर औद्योगिक वसाहतीमधील काही टेक्सटाइल्स, केमिकल आणि फार्मा उद्योगांना बेकायदा पुरवठा केला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

काळय़ा बाजारात जाणाऱ्या युरियाची वाहतूक करणारी गाडी पोलिसांनी पकडल्यानंतर युरिया साठय़ाचा पंचनामा ठाणे व पालघर कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांच्यामार्फत केला जातो. संशयित युरियाची तपासणी करून त्याचे नमुने तपासणीसाठी नाशिक, पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले जातात. मात्र या धंद्यात कनिष्ठापासून वरिष्ठापर्यंत अर्थकारण करणारी प्रभावशाली टोळी सक्रिय असल्याने तपासणीत युरिया खतामध्ये पॅकिंग आणि गोण्यांमध्ये केलेला फेरबदल दुर्लक्षिला जातो आणि कारवाई होत नाही, असा आरोप करण्यात येतो.

दरम्यान, यापूर्वी पालघर जिल्ह्यातील युरियाचा वापर सरासरीपेक्षा अधिक असल्याने गेल्या खरीप हंगामात युरिया वितरणावर अंकुश ठेवण्यात आला होता तसेच वितरकांकडील साठय़ाचे लेखा परीक्षण करून काही वितरकांविरुद्ध कारवाई करण्यात आली होती. आता युरियाची वाहतूक करणारा ट्रक पकडल्यानंतर त्याचे सूत्रधार पालघर व डहाणू तालुक्यात असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. या ठिकाणची काही संबंधित मंडळी कारवाईच्या ठिकाणी असल्याचे, तर काही लोकप्रतिनिधी या प्रकरणात कारवाई टाळण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती पुढे आली आहे.

२७० रुपयांचा युरिया तीन हजारांना
उद्योगांना प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक टेक्निकल ग्रेडचा युरिया खताची आवश्यकता असते. ५० किलो गोणीची किंमत सरासरी तीन हजार रुपयांपर्यंत असते. अनुदानित युरिया खत कृषी सेवा केंद्रात मात्र फक्त २७० रुपयांना मिळते. या गोरखधंद्यात मोठा फायदा असल्याने बोईसर परिसरात अनेक युरिया माफिया तयार झाले आहेत. काही कृषी सेवा केंद्रचालक, सर्वपक्षीय राजकीय नेते-पदाधिकारी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून महिन्याला हजारो टन युरियाचा काळाबाजार केला जात असल्याचा प्रकार अनेक वेळा कृषी विभागाच्या कारवाईतून समोर आला आहे.

पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऐन हंगामात पुरेशा प्रमाणात युरिया खत मिळत नाही. मात्र दुसरीकडे तारापूर एम.आय.डी.सी.मधील कारखान्यांना काळाबाजार करून युरिया पुरविला जातो. या सर्व प्रकाराला कृषी अधिकारी जबाबदार असून त्यांनी खताचा काळाबाजार करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करावी.-अविनाश पाटील, जिल्हाध्यक्ष, कुणबी सेना पालघर

पालघर कृषी विभागाकडून सर्व कृषी केंद्राची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये जर कोणी दोषी आढळला तर कठोर कारवाई करण्यात येईल.-दिलीप नेरकर, कृषी अधीक्षक, पालघर

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhiwandi is the main hub of urea mafia in palghar district amy
First published on: 19-01-2023 at 00:31 IST