पालघर : पालघर जिल्ह्यात समर्पित मालवाहू रेल्वे मार्गाच्या उभारणीशी संबंधित उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गांमधील गळती सुरू असून भुयारी मार्गात साचणाऱ्या पाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष इलेक्ट्रिक पंप बसवण्यात आले आहेत. या भुयारी मार्गांच्या जोड रस्त्यांवर असणाऱ्या तीव्र वळणांवर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आरसे बसवण्यात आले आहेत.
भुयारी मार्गांमध्ये पावसाळ्यात होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाच्या विरोधात तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी (समन्वय) महेश सागर यांनी या बाबतीत पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या संयुक्त बैठकीदरम्यान रेल्वे अधिकाऱ्यांना असे आरसे लावणे सुरक्षेच्या दृष्टीने कसे आवश्यक आहे हे पटवून सांगितले. वाहनांच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण असणारे हे आरसे बसवण्यासाठी गेले वर्षभर शासनाशी पत्रव्यवहार करून हे यश पदरात पडले असल्याबद्दल समाधान केळवे रोड पूर्वेकडील रहिवासी मधुसूदन जोशी यांनी व्यक्त केले आहे.
भुयारी मार्गाच्या काँक्रीट भिंतीमधून गळती असल्याने पाण्याचे झरे व फवारे भुयारी मार्गात पावसाळ्यात पाणी टाकत असल्याचे चित्र अजूनही कायम आहे. गेल्या पंधरवड्यात पावसाची तीव्रता कमी असल्याने भुयारी मार्गात शासनाने पाण्यामुळे दैनंदिन वाहतुकीला विशेष अडथळा झाला नव्हता. पावसाचे पाणी साचल्यास त्याचा उपसा करण्यासाठी सेन्सर वर आधारित विद्युत पंप बसवण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालय झालेल्या बैठकीत देण्यात आली.
बुलेट ट्रेनच्या उभारणी दरम्यान कपासी केळवे रोड तसेच पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या रोठे फाटक ते मोहाळे व डोंगरी भागातील रस्ता (सध्या जिल्हा परिषदेकडे वर्ग) या रस्त्यांची अवजड वाहतुकीमुळे दुरवस्था झाली असून या दोन्ही रस्त्यांचे काम बुलेट ट्रेन व्यवस्थापनाकडून सुरू करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. पावसाने उघडीप घेतल्यानंतर हे काम पूर्ण करण्यात येईल असेही संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांकडून आश्वासित करण्यात आले होते.
समस्या कायम
भुयारी मार्गाच्या भिंतीमधून गळती होणाऱ्या पाण्याचा उपसा करण्याची व्यवस्था रेल्वे व्यवस्थापनाने अखली असली तरीही पाण्यासोबत भुयारी मार्गाच्या तळाला असलेल्या मातीमुळे भुयारी मार्गात चिखल झाल्याने हा मार्ग निसरडा होत आहे. वीज प्रवाह खंडित झाल्यास विद्युत पंपांद्वारे पाणी उपसण्याच्या क्रियेला पर्याय म्हणून डिझेल पंपांची व्यवस्था करण्यात आली असून या डिझेल पंपांच्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
सुमारे ७० मीटर लांबीच्या भुयारी मार्गात दिवसादेखील प्रकाश व्यवस्था कार्यरत नसल्याने अंधुक वातावरणात प्रवास करणे भीतीदायक ठरत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली असून भुयारी मार्गांमध्ये प्रकाश व्यवस्था उभारण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तयारी दर्शवली आहे.