scorecardresearch

विनाशकारी प्रकल्पांविरोधात पालघरच्या आमदारांची पाठ?; विधान भवनात केवळ एकाच आमदाराचे आंदोलन

पालघर जिल्ह्यातील चार आदिवासी आमदारांनी एकत्र येत वाढवण बंदरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या इतर विनाशकारी प्रकल्पांना विरोध दर्शवून येथील जनतेसोबत असल्याचे त्यांनी सांगितले होते.

विनाशकारी प्रकल्पांविरोधात पालघरच्या आमदारांची पाठ?; विधान भवनात केवळ एकाच आमदाराचे आंदोलन
विनाशकारी प्रकल्पांविरोधात पालघरच्या आमदारांची पाठ?

पालघर : पालघर जिल्ह्यातील चार आदिवासी आमदारांनी एकत्र येत वाढवण बंदरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या इतर विनाशकारी प्रकल्पांना विरोध दर्शवून येथील जनतेसोबत असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र विधानसभा अधिवेशनादरम्यान चार आमदारांपैकी डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनीच  विधानसभा परिसरात निदर्शने केली. त्यामुळे इतर आमदारांची भूमिका गुलदस्त्यात असल्याची जोरदार चर्चा आहे.

आमदार सुनील भुसारा, राजेश पाटील, विनोद निकोले, श्रीनिवास वनगा या चारही आमदारांनी पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विनाशकारी प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. इतकेच नव्हे तर अलीकडेच जिल्ह्यामध्ये नोकरभरती आरक्षण संदर्भामध्ये सर्व आमदारांनी एकत्रित येऊन अनुसूचित जाती व ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडवण्याचे मान्य केले होते. परंतु अलीकडेच महाविकास आघाडी सरकार पडून शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले आहे. त्यात श्रीनिवास वनगा हे  या सरकारमधील आमदार आहेत. या सरकारला बहुजन विकास आघाडीने विविध मार्गी पाठिंबा दिल्यामुळे  राजेश पाटीलही त्यांच्या सोबत आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील  भुसारा यांनीही विनोद निकोले यांना साथ न दिल्यामुळे त्यांची प्रकल्पविरोधी भूमिका संशयास्पद असल्याचे सांगितले जात आहे.

दर विधानसभेला जिल्ह्याचे आमदार सुनील भुसारा, राजेश पाटील, विनोद निकोले, श्रीनिवास वनगा  हे चारही आदिवासी आमदार एकवटून शेतकरी, आदिवासी, भूमिपुत्रांना त्रासदायक ठरणारे व सध्या सुरू असलेले विविध विनाशकारी प्रकल्पांना विरोध करत होते. मात्र या वेळी विनोद निकोले यांना पाठिंबा न दिल्यामुळे पूर्वी प्रकल्पांना विरोध करणाऱ्या इतर तिन्ही आमदारांचा विरोध मावळला की काय अशी चर्चा सध्या पालघरमध्ये केली जात आहे.

आमदार विनोद निकोले यांनी आपल्या मतदारसंघापुरती मर्यादित न राहता जिल्ह्यात सुरू असलेल्या विनाशकारी प्रकल्पांना विरोध दर्शवला. जनतेला उद्ध्वस्त करणारे वाढवण बंदर रद्द करा, मुंबई-बडोदा सुपरफास्ट हायवे, रेल्वे फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पामध्ये भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना न्याय द्या, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करा, वनाधिकार कायदा आणि पेसा कायद्याची कसोशीने अंमलबजावणी करा अशा घोषणा निकोले यांनी विधान भवन परिसरात देऊन निषेध आंदोलन केले. विनोद निकोले आंदोलन करत असताना जिल्ह्यातील तीन आमदार नसले तरी शिवसेना आमदार सचिन अहिर, आ. सुनील शिंदे यांनी या आंदोलनात सहभागी होऊन विनोद निकोले यांना व त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या