महाविद्यालयांकडून स्वत:च्या संकेतस्थळाचा पर्याय; परिपत्रकांमुळे संभ्रमात वाढ

पालघर : राज्याच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत पालघर जिल्ह्यातील ‘ऑफ लाइन’ अकरावी प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र या प्रवेश प्रक्रियेसाठी फक्त सात दिवस मुदत असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक चिंतेत आहेत. ‘ऑफलाइन’ प्रवेश असला तरी काही महाविद्यालयांनी स्वत:च्या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचे परिपत्रक काढल्यामुळे विद्यार्थी व पालक पुन्हा एकदा संभ्रमात सापडले आहेत.

इतर जिल्ह्यांसाठी अकरावी प्रवेश प्रक्रिया यापूर्वीच राबवण्याचे आदेश उपसंचालक कार्यालयामार्फत देण्यात आले होते. पालघर जिल्ह्यासाठी हे आदेश बुधवारपासून लागू करण्यात आले आहेत. असे असले तरी प्रत्यक्षात प्रवेश प्रक्रियेचे अर्ज वितरण व संकलन सात दिवसांत पूर्ण करून पुढील प्रक्रिया करायची आहे. दरम्यान, हा सात दिवसांचा अवधी या प्रक्रियेसाठी अत्यल्प असल्याचे पालक व विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.

पालघर जिल्ह्यातील काही महाविद्यालयांमार्फत करोना स्थिती लक्षात घेता प्रवेश प्रक्रियेसाठी ‘ऑनलाइन’ प्रणालीचा अवलंब केला जात असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अंतरजाल (इंटरनेट)अभावी या प्रक्रियेत सहभाग घेणे गैरसोयीचे ठरत आहे. तर दहावी उत्तीर्ण झालेल्या काही विद्यार्थ्यांना अजूनही शाळा सोडल्याचे दाखले व प्रवेशासाठी लागणारी तत्सम कागदपत्रे हाती न आल्याने त्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेता येत नाही. या पार्श्वभूमीवर प्रवेश प्रक्रियेसाठी आणखीन एक आठवडा वाढवून द्यावा अशी मागणी महाविद्यालय, पालक व विद्यार्थ्यांमधून होत आहे.

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीणबहुल भागात अंतरजालाचा मोठा अभाव आहे. त्यात आर्थिकदृष्टय़ा दुर्बल असलेल्या काही विद्यार्थ्यांकडे मोबाइल नाहीत. त्यांना ‘ऑफलाइन’ प्रवेशाशिवाय पर्याय उरत नाही. अशा वेळी महाविद्यालयात जाऊन सर्व सोपस्कार पार पाडण्यासाठी किमान दोन दिवसांचा वेळ लागत आहे. काही विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली असली तरी आर्थिक संकटामुळे त्यांच्याकडे प्रवेश शुल्क भरण्यासाठी पैसे नाही.

ही जमवाजमव करण्यासाठी त्यांच्या पालकांची दमछाक होणार आहे. या सर्व बाबी लक्षात घेता शिक्षण उपसंचालक कार्यालयाने प्रवेश प्रक्रियासाठी काही दिवसांची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी यानिमित्ताने समोर येत आहे.

सात दिवसांची कसरत

पालघर जिल्ह्यामध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेदरम्यान १८ ते २३ ऑगस्टपर्यंत प्रवेशाचे अर्ज वितरण करावयाचे आहे. २५ ऑगस्टपर्यंत प्रवेश प्रक्रियेच्या अर्जाचे संकलन केले जाणार आहे. २६ ऑगस्ट रोजी पहिली गुणवत्ता यादी प्रदर्शित करून ३० ऑगस्टपर्यंत यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क स्वीकारायची मुदत आहे. १ सप्टेंबर रोजी पहिल्या यादीत रिक्त असलेल्या जागांसाठी विद्यार्थ्यांची दुसरी यादी जाहीर करावयाची आहे. याचे शुल्क भरण्यासाठी ४ सप्टेंबपर्यंतची मुदत आहे. तर ६ सप्टेंबर रोजी दुसऱ्या यादीच्या रिक्त जागांसाठी तिसरी यादी घोषित करून ९ सप्टेंबपर्यंत तिसऱ्या यादीचे शुल्क स्वीकारायचे आहे. १९ सप्टेंबर रोजी तिसरी यादी जाहीर करून तिसऱ्या यादीतील रिक्त जागांसाठी विद्यार्थ्यांची चौथी यादी जाहीर करणे आबश्यक आहे व त्यांना १४ सप्टेंबपर्यंत प्रवेश शुल्क द्यायचे आहे. यानंतर आलेले प्रवेश अर्ज व शाखानिहाय क्षमता याची माहिती त्या त्या महाविद्यालयांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे सादर करायची आहे.

प्रवेश प्रक्रियेसाठी दिलेली मुदत अत्यल्प आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांची धावपळ होणार आहे. हे लक्षात घेत प्रवेशाची मुदत वाढवून द्यावी अशी सर्वाची मागणी आहे.

– डॉ. किरण सावे, प्राचार्य, सोनोपंत दांडेकर महाविद्यालय

अकरावीचे शैक्षणिक वर्ष लक्षात घेता या प्रवेशाची मुदत पुरेशी आहे. तरीही मुदतवाढीची वेळ किंवा मागणी आल्यास त्यावर सकारात्मकता दाखविली जाईल.

– राजेश कंकाळ, सहायक संचालक, राज्य शिक्षण उपसंचालक कार्यालय