scorecardresearch

महामार्गावरील सुसरी पुलाच्या दुरुस्तीला सुरुवात

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ओसरवीरा येथील सुसरी नदीवरील पुलावर खड्डे पडले असून पूल जीर्णही झाल्याने धोकादायक स्थितीत असल्याने दुरुस्ती करणे गरजेचे होते. 

पूल दोन दिवस बंद; वाहनचालकांना दिलासा; अपघातांचे प्रमाण घटणार

कासा :   मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ओसरवीरा येथील सुसरी नदीवरील पुलावर खड्डे पडले असून पूल जीर्णही झाल्याने धोकादायक स्थितीत असल्याने दुरुस्ती करणे गरजेचे होते.  अखेर पाठपुराव्यानंतर या पुलाचे काम सुरू झाले असून ते दोन दिवस केले जाणार आहे. महामार्गावरील अनेक समस्या यामध्ये महामार्गावर पडलेले खड्डे, अपूर्ण सेवा रस्ते, अनधिकृत कट, उड्डाणंपुलावरील समस्यांसाठी ऑल इंडिया वाहनचालक-मालक महासंघाचे महाराष्ट्र प्रवक्ता हरबन्स नन्नाडे यांनी अनेक वेळा आवाज उठवला. पण समस्या काही सुटत नव्हत्या, अपघातांची संख्या वाढतच आहे. यामुळे शेवटी त्यांनी हा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव योगेश नम यांना सांगितला. त्यांनी लगेच सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्यापर्यंत समस्याबाबत माहिती पोहचवली. त्यांनी लगेच १० जानेवारीला तातडीने संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या समस्या सोडविण्यास सांगितले.

त्यामुळे लगेचच महामार्ग प्रशासन जागे होऊन १३ जानेवारीपासून या सुसरी पुलाच्या दुरुस्तीच्या कामास लागले. यंत्रे आणून पुलाच्या वर पडलेले खड्डे तसेच पुलाखालील नादुरुस्त गंजलेले लोखंडी काम काढून दुरुस्ती केली जात आहे. आणखी दोन दिवस तो वाहनासाठी पूल बंद ठेवला जाणार असून दोन दिवसांनी पूर्ववत केला जाईल. त्यामुळे वाहनचालक समाधान व्यक्त करत आहेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अनेक समस्या असल्याने अपघात होत आहेत. यामध्ये नादुरुस्त पूल, अपूर्ण सेवारस्ते, अनधिकृत कट, उड्डाणपुलांवरील अन्य समस्या यामुळे अपघात घडत आहेत.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Repair bridge highway pool closed consolation motorists ysh

ताज्या बातम्या