पालघर: सातपाटी येथे वापरात असणाऱ्या मासेमारी जेटीमध्ये बोटीना प्रवेश करण्यासाठी खाडीमधील गाळाची अडचण येत आहे. सातपाटी समुद्र किनाऱ्यालगत नव्याने मासेमारी जेटी उभारण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने शासनाकडे ३५४ कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव सादर केला आहे. या जेटीची उभारणी झाल्यास सातपाटी येथील स्थानिक मच्छीमारांना आपल्या मासेमारी बोटी सहजपणे नांगरणे, त्यांची लँडिंग करणे, माशांची हाताळणी व खरेदी-विक्री करण्यासाठी तसेच आवश्यकता भासल्यास साठवण्यासाठीच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे.
मच्छीमारांना सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्यात मत्स्यव्यवसाय विभागाची असली तरीही राज्य शासनाने सातपाटी सह भरडखोल, जीवना, हर्णे व साखरीनाटे या ठिकाणी मत्स्यबंदर व पायाभूत सुविधा उभारण्याचे काम महाराष्ट्र सागरी मंडळाकडे जून २०२१ मध्ये सोपवण्यात आले होते. त्यानुसार या ठिकाणी नव्याने मासेमारी जेट्टी उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.




हेही वाचा… शहरबात : जिल्हा मुख्यालय चिनी मालाप्रमाणे अल्पायुषी?
सातपाटी येथे नैसर्गिक बंदर कार्यान्वित असून या ठिकाणी सुमारे ३५० बोटी मासेमारी करीत आहेत. सातपाटी-मुरबे खाडीच्या तोंडावर खडक असल्याने येथील बोटीने शिरगाव मार्गे वळसा घालून यावे लागत आहे. सातपाटीखाडी मध्ये मोठ्या प्रमाणात माती मिश्रित वाळूचा गाळ साचल्याने बोटीला बंदरामध्ये प्रवेश करण्यासाठी अनेकदा चार ते सहा तास थांबून राहावे लागते. खाडीतील खोली वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येणार असून याबाबत प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे.
दरम्यान मच्छीमारांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून सातपाटी समुद्रकिनाऱ्यालगत सुमारे ४०० मीटर लांबीची मासेमारी जेटी प्रस्तावित करण्यात आली असून या जेटी प्रकल्पाचा ब्रेकवॉटरचा अभ्यास करण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई आयआयटी तर्फे २५ एप्रिल २०२३ रोजी अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार सुधारित मांडणी लेआउट सुचवण्यात आला असून त्यामध्ये ब्रेक वॉटरच्या लांबी, रुंदी व उंची मध्ये वाढ करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने यापूर्वी जेटी उभारण्यासाठी प्रस्तावित असलेल्या २८१ कोटी रुपयांच्या खर्चात वाढ झाली असून ३५४ कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
हेही वाचा… पालघर मध्ये अमली पदार्थाचा कारखाना, ३७ कोटींची एमडी जप्त; मीरा भाईंदर वसई विरार गुन्हे शाखेची कारवाई
या प्रकल्पाला पर्यावरण विभागाची परवानगी तसेच उच्च न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक असून सीझेडएमपीएस आराखड्यामध्ये ही मासेमारी जेटी उभारण्यासाठी अनुमती प्राप्त आहे. या बंदरा विषयी सातपाटी येथील नागरिकांना माहिती देऊन त्यांच्याकडून सूचना घेण्यात येतील असे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले.
कशी असेल नवीन सातपाटी मासेमारी जेटी
सातपाटी येथील मत्स्यव्यवसाय शाळेच्या बाजूने समुद्राकडे उतरणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा सुमारे २०० मीटर लांबीची ही जेटी उभारण्यात येणार आहे. दक्षिणेच्या बाजूने १००० मीटर लांबीचा व उत्तरेच्या बाजूने ५९७ मीटर लांबीच्या ब्रेकवॉटर बंधारा उभारण्यात येणार असून त्या ठिकाणी बोट दुरुस्ती, मासे हाताळणी लिलाव व साठवणुकीसाठी जाळी विणणे, गिअर शेड यासाठी सुमारे ७५०० चौरस मीटर तसेच प्रशासकीय इमारत, उपहारगृह, विश्रांती गृह, बोट दुरुस्ती शेड, रेडिओ कम्युनिकेशन केंद्र, स्वच्छतागृह यासाठी सुमारे ९०० चौरस मीटर क्षेत्रफळ उपलब्ध राहणार आहे. यासाठी एक लाख ८९ हजार घनमीटर भराव करण्यात येणार आहे.
याखेरीस सुमारे ६००० चौरस मीटरचे डांबरी रस्ते, ३००० चौरस मीटरचे काँक्रिटीकरण, २२००० चौरस मीटरचे डब्लूबीएम करणे व ४५० मीटरची संरक्षण भिंत उभारण्याचे काम अंतर्भूत आहे. याखेरीस अस्तित्वात असलेल्या धूप प्रतिबंधक बंधाराच्या पूर्वेच्या बाजूला दळणवळण सोयीचे होण्याच्या दृष्टिकोनातून सुमारे ९०० मीटर लांबीचा रस्ता उभारण्यात येणार आहे. त्या बरोबरीने २४०० चौरस मीटरचे पेवर ब्लॉक असणारी पार्किंग सुविधा या बंदराच्या जवळ उभारण्यात येणार असून मासेमारीसाठी सुसज्ज व सुविधा युक्त व्यवस्था उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.