सुहास सरदेशमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्रपती संभाजीनगर: ‘ आवाज कुणाचा’ ही घोषणा जेवढी लोकप्रिय तेवढीच ‘ पन्नास खोके’ ही घोषणाही शिवसैनिकमध्ये रुजली. ‘उडाले ते कावळे, राहिले ते मावळे’ हेही म्हणून झाले. सहानुभूतीचा जोर ओसरला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या बदलत्या भूमिकेनुसार कार्यकर्त्यांची उठबसही आता बदलू लागली आहे. शिवसेनेच्या नेत्यांकडे आता मुस्लिम कार्यकर्त्यांचा राबता वाढू लागला आहे. मात्र, बदलत जाणाऱ्या भूमिकाशी जळुवून घेणाऱ्या कार्यकर्त्यांसमोर अद्यापि लोकसभेचा उमेदवार कोण याचे गणित काही उलगडत नसल्याने संभ्रम कायम आहे. छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढविण्यास चार वेळा औरंगाबादचे खासदार राहिलेले नेते चंद्रकांत खैरे यांनी दावा केला आहे. त्याच वेळी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हेही लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. या दोघांमध्ये उमेदवार कोण, हे नेतृत्वाने स्पष्टपणे सांगितले नसल्याने ठाकरे गटाचे राजकीय काम ‘ आस्ते कदम’ सुरू आहे.

बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या भूमिकांपेक्षाही प्रबोधनकारांच्या भूमिका शिवसैनिकांपर्यंत तातडीने पोहचवत उद्धव ठाकरे गट नवी मांडणी करत आहे. प्रबोधनकार आणि प्रागतिक भूमिका मांडणाऱ्या नेत्यांमध्ये सुषमा अंधारे यांचा समावेश प्रामुख्याने केला जातो. ‘ जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करताना मारला गेलेला औरंगजेब नावाचा सैनिक आम्हाला हवा आहे. ते आमचे हिंदूत्व आहे, अशी नवी भूमिका उद्धव ठाकरे यांनी भाषणांमधून मांडली. भाजपसमोर आपल्या भाषणातून उद्धव ठाकरे यांनी आव्हान उभे केल्याचा संदेश गेल्यानंतर औरंगाबादमधील शिवसेना नेत्यांकडे ‘ मुस्लिम’ व्यक्तींचा राबता वाढला आहे. चंद्रकांत खैरे खासदार असतानाही त्यांचा मुस्लिम मतदारांशी चांगला संपर्क होता. आता मात्र त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. आपल्या हिंदूत्वाच्या भूमिकेपासून आपण हटलो नाही, असा दावा खैरे करत असतात. ‘ आम्ही हिंदुत्त्वासाठी जेवढे काम केले तेवढे कोणीच केले नाही. आजही उद्धव ठाकरे यांचे समर्थकच आपल्यासाठी काम करतात, हे सर्व जनतेला माहीत आहे. त्यामुळे आमच्या हिंदुत्त्वावर कोणी प्रश्नचिन्ह लावू शकत नाही’ असेही शिवसेना नेते सांगतात.

हेही वाचा… कोकणातील जलविद्युत प्रकल्पाला पाणी देण्यास कोल्हापुरातील सर्वपक्षीयांचा विरोध

हेही वाचा… तटकरे यांचे विश्वासू सहकारी सुरेश लाड भाजपमध्ये राष्ट्रवादीला धक्का

एका बाजूला बदलणाऱ्या भूमिकांशी जुळवून घेणारे शिवसैनिक ‘पन्नास खोके’ चा प्रचार जोरदार करत असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभेचा उमेदवार कोण असा प्रश्न विचारु लागले आहेत. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी लोकसभा लढविण्याची भूमिका घेतली आहे. त्या दृष्टीने त्यांनी पक्षीय पातळीवर कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे उमेदवार कोण, या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेले नाही. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. शिवसेनेकडून गेल्या काही दिवसात मराठवाड्याच्या प्रश्नावर कोणतेही मोठे आंदोलन उभे केले नाही. जायकवाडी धरणातील पाण्याची अडवणूक झाल्यानंतर सर्वपक्षीय आंदोलनात केवळ नंदकुमार घोडले वगळता अन्य कोणी नेते वा कार्यकर्ते सहभागी झाले नाहीत. मोठ्या सभा घेतल्या की आपले काम झाले हा शिवसेना नेत्यांची जुनी कार्यपद्धती अजूनही जशास तशी सुरू आहे. कार्यकर्त्यांच्या बैठका कोकणात झाल्या. मात्र, मराठवाड्यात बैठका झाल्या नाहीत. त्यामुळे काही कार्यक्रम ठरलाच तर उद्धव ठाकरे गटाचे काही मोजके कार्यकर्ते एकत्र येतात. उमेदवारीचे निर्णय न झाल्याने उद्धव ठाकरे गटातील संभ्रम वाढलेले आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Between chandrakant khaire and ambadas danve who will contest sambhajinagar lok sabha seat from shiv sena uddhav thackeray group print politics news asj
First published on: 22-12-2023 at 11:01 IST