या वर्षाच्या अखेरीस राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा अशा महत्त्वाच्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यानंतर पुढच्याच वर्षी लोकसभेच्याही निवडणुका होणार आहेत. काँग्रेसने या सर्व निवडणुका पूर्ण ताकदीने लढण्याचा निश्चय केला आहे. याच कारणामुळे या पक्षात राज्य तसेच देशपातळीवर अनेक बदल केले जात आहे. काँग्रेसने नुकतेच आपल्या केंद्रीय निवडणूक समितीची पूनर्रचना केली आहे. नव्या केंद्रीय निवडणूक समितीत काँग्रेसच्या दिग्गज आणि वरिष्ठ नेत्यांना वगळण्यात आले असून राज्य पातळीवरच्या काही नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. राज्यातील संघटन मजबूत व्हावे, हा यामागचा काँग्रेसचा विचार आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची (सीईसी) पुनर्रचना केली. या समितीत आता राज्य पातळीवरच्या काही नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. तर ए. के अँटोनी, जनार्धन द्विवेदी, एम विरप्पा मोईली अशा दिग्गज नेत्यांना सीईसीमधून वगळण्यात आले आहे. या समितीच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे अध्यक्ष असतात. तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सदस्य निवडीची जबाबदारी या समितीवर असते.
राहुल गांधी, सोनिया गांधी समितीत कायम
याआधी या समितीमध्ये काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, ए. के. अँटोनी, अंबिका सोनी, गिरिजा व्यास, द्विवेदी, मोईली, मुकूल वासनिक, मोहसिना किडवाई, काँग्रेसचे संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल इत्यादी नेते होते. मात्र नव्या निवडणूक समितीतून सोनिया गांधी, राहुल गांधी, सोनी, वेणुगोपाल, मनमोहन सिंग यांच्याव्यतिरिक्त सर्व नेत्यांना वगळण्यात आले आहे.
नव्या निवडणूक समितीत १६ सदस्य
या केंद्रीय निवडणूक समितीत एकूण १६ सदस्य आहेत. लोकसभेतील काँग्रेसच गटनेते अधीर रंजन चौधऱी, सलमान खुर्शिद, मधुसदन मिस्त्री, एन. उत्तम कुमार रेड्डी, छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री टी. एस. सिंह देवा, कर्नाटकचे मंत्री के. जे. जॉर्ज, उत्तराखंड काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रितम सिंह, किशनगंजचे खासदार मोहम्मद जावेद, राज्यसभेतील खासदार अमी याज्ञिक, पी. एल. पुनिया, मध्य प्रदेशचे आमदार ओमकार मार्कम आदी नेत्यांचा समावेश आहे. याआधी मधुसदन मिस्त्री हे काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली होती. पुनिया हे छत्तीसगड काँग्रेसचे प्रभारी होते.
पहिल्या बैठकीसाठी तेलंगणाची निवड
दरम्यान, काँग्रेसने तेलंगणाच्या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसकडून तेलंगणात आतापासूनच प्रचाराला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नुकत्याच पुनर्रचना झालेल्या काँग्रेसच्या कार्यकारिणीची पहिली बैठक तेलंगणामध्ये होणार आहे. आगामी काळात येथे होणारी विधानसभा निवडणूक लक्षात घेता या राज्यातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना बळ मिळावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या १६ आणि १७ सप्टेंबर रोजी तेलंगणातील हैदराबाद येथे ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीदरम्यान काँग्रेसतर्फे हैदराबादमध्ये मोठ्या रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये काँग्रेस तेलंगणा राज्यातील जनतेला पाच मोठी आश्वासने देणार आहे. काँग्रेसने अशाच प्रकारची आश्वासनं कर्नाटक राज्यातही दिली होती. काँग्रेस आपल्या या आश्वासनांना ‘गॅरंटी’ म्हणतो.
मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा
तसेच काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीच्या दोन दिवसीय बैठकीत काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, प्रदेशाध्यक्ष यांच्याशीदेखील चर्चा करण्यात येणार आहे. १७ सप्टेंबर हा तेलंगणा एकात्मता दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी काँग्रेस रॅलीचे आयोजन करणार आहे. या रॅलीदरम्यान काँग्रेस आपल्या ५ आश्वासनांची घोषणा करणार आहे. भविष्यात काँग्रेस तेलंगणातील सर्व ११९ मतदारसंघांत जाऊन प्रचार करणार आहे.