जळगाव : भाजपला सोडचिठ्ठी देत गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेले उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पाटील हे रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार तथा विद्यमान खासदार रक्षा खडसे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. जिल्ह्यात सत्ताधारी भाजपमधून जळगावचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील, पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार (पाटील) यांनी शिवसेना ठाकरे गटात अलिकडेच प्रवेश केला असताना आता रावेरचे उद्योजक श्रीराम पाटील यांनी शरदचंद्र पवार गटात जाहीर प्रवेश करुन उमेदवारीही मिळवली आहे. विधानसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी करण्याची तयारी पाटील यांनी केली होती. याबाबतची घोषणाही त्यांनी केली होती. पाटील यांची राजकीय कारकीर्द अवघ्या दोन महिन्यांची म्हणता येईल. १४ फेब्रुवारीला त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना भाजपकडून रावेरमधून उमेदवारी मिळेल, असे अपेक्षित असताना रक्षा खडसेंना तिसर्यांदा संधी देण्यात आल्याने ते नाराज झाले होते.

रावेरमध्ये योग्य उमेदवार मिळत नसल्याने शरदचंद्र पवार गटाकडून चाचपणी सुरु होती. भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, विनोद सोनवणे यांची नावे आघाडीवर होती. त्यातच श्रीराम पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. सोमवारी पुणे येथील मोतीबागेत पक्षाची बैठक झाली. बैठकीसाठी उद्योजक पाटील यांना शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून बोलाविणे आले होते. बैठकीत अॅड. रवींद्र पाटील आणि उद्योजक पाटील यांची नावे अंतिम निश्चित करण्यात आल्यावर रात्री उद्योजक पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरदचंद्र पवार गटात प्रवेश करुन उमेदवारीही मिळवली.

हेही वाचा : भाजपाच्या ‘या’ नेत्यावर तृणमूल नेत्यांविरुद्ध कट रचल्याचा आरोप

रावेर मतदारसंघ हा एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला, असे म्हटले जाते. लोकसभेच्या रावेर मतदारसंघात रावेर व मलकापूर येथे काँग्रेसचे आमदार असून, रावेरमध्ये शिरीष चौधरी व मलकापूरमध्ये राजेश एकाडे हे आमदार आहेत. भाजपकडे ३५ वर्षांपासून असलेल्या या बालेकिल्ल्यात भाजपला आव्हान देण्यासाठी शरद पवार गटाने मराठा समाजाचा चेहरा पुढे आणला आहे. पाटील यांना घरात कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. उच्च, सुशिक्षित व अभ्यासू व्यक्तिमत्त्व असल्यामुळे संसदेत लोकप्रश्नांची चांगली मांडणी करतील, म्हणून त्यांना शरद पवार गटाने पसंती दिली आहे. चांगली प्रतिमा, उद्योजक आणि मराठा अशा जमेच्या बाजू त्यांच्या बाबतीत सांगण्यात येतात.

हेही वाचा : NDA मध्ये पंतप्रधान मोदीच नेते, बाकी त्यांचे अनुयायी; तेजस्वी यादवांची टीका

उद्योजक श्रीराम पाटील कोण आहेत ?

उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते श्रीराम दयाराम पाटील (५३) यांनी फेब्रुवारीत भाजपमध्ये प्रवेश करून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. पाटील हे साईराम इरिगेशन आणि सिका ई-दुचाकी निर्मिती उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा आहेत. रावेर तालुक्यातील रणगाव हे त्यांचे जन्मगाव. त्यांनी स्वतः रावेर येथे श्रीराम ऑटो सेंटर, श्रीराम मॅक्रोव्हिजन अकादमी, श्रीराम फाउंडेशन, श्रीराम अॅग्रो प्लास्ट उद्योगसमूह उभारले आहेत. याशिवाय श्री साईराम प्लास्टिक व इरिगेशनच्या रावेर, नशिराबाद, जळगाव येथे शाखा आहेत. महाराष्ट्र गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक अशा विविध राज्यांत त्यांच्या व्यापाराचे कार्यक्षेत्र विस्तारले आहे. एक सामान्य मेकॅनिकपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज उद्योजकापर्यंत पोहचला आहे.