छत्रपती संभाजीनगर : धाराशिव जिल्ह्यातील परंडा मतदारसंघाचे माजी आमदार राहूल मोटे यांचा मंगळवारी दुपारी मनगटी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार आहेत. अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारणाऱ्यांची संख्या आता वाढू लागली आहे. विरोधी पक्षात नको रे बाबा , अशी सर्व पक्षीय स्थिती दिसून येत आहे.
राष्ट्रवादी कॉग्रेसच्या शरद पवार पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर पराभूत होणारे उमेदवार आता अजित पवार यांच्याकडे सरकू लागले आहेत. गंगापूर मतदारसंघातून निवडणूक लढविणारे सतीश चव्हाण यांच्यानंतर राहूल मोटे यांनी पक्षांतराचा निर्णय घेतला आहे. सुनील तटकरे यांच्या संघटनात्मक बांधणी दरम्यान राष्ट्रवादीत अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्यानंतर पक्षांतर करुन अजित पवार गटात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. या राजकीय घडामोडीमागे सत्तेचा प्रभाव आणि अर्थखात्याचे बळ असल्याची चर्चा राजकीय पटलावर होत आहे.

अलिकडेच भास्करराव खतगावकर यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. त्यांच्या स्नुषा यांनी काही दिवसापूर्वी शिवसेनेच्या शिंदे गटात चाचपणी केली. मात्र, त्यांना काही आमदारांचा विरोध असल्याने त्यांनीही अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारले. लोह्याचे आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी नांदेडमध्ये राष्ट्रवादीला बळ दिले. घाऊक पक्षांतर करुन घेताना त्यांनी केलेल्या चुकांमुळे त्यांना माफीही मागावी लागली. मात्र, राष्ट्रवादीत ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार अविनाश घाटे, मोहन हंबर्डे ही मंडळी आली. अशोक चव्हाण यांच्याबरोबर काम करणारे बाळासाहेब रावणगावकर पुढे राष्ट्रवादीमध्ये आले. ते आता जिल्हाधक्ष झाले आहेत. भोकर, नायगाव, मुखेड, कंधार, काही प्रमाणात देगलूर तालुक्यातील राष्ट्रवादीचे बळ वाढले आहे.

अशोक चव्हाण यांच्यामुळे सत्तेमध्ये माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत, बी. आर कदम ही मंडळी आली. अशोक चव्हाण यांच्यामार्फत जालन्याचे कैलास गोरंट्याल यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. कोणत्याही मार्गे या सत्तेचा रस्ता हवा असणाऱ्या मंडळीची संख्या वाढत आहेत. जालन्यातून सुरेश जेथलिया यांनी हाती घड्याळ बांधल्यानंतर कॉग्रेसचे शहराध्यक्ष शेख मेहबूब यांनीही सत्ता पक्ष जवळ केला. आता या घाऊक पक्षातरांच्या काळात परंड्याचे आमदार राहुल मोटे हे दुपारी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. कौटुंबिक पातळीवर अजित पवार आणि शरद पवार यांच्या गाठीभेटी होत असल्याने या राष्ट्रवादीतून तुतारी वाजवणारी मंडळी सहजपणे अजित पवार यांचे नेतृत्त्व पुन्हा स्वीकारु लागल्याचे चित्र मराठवाड्यात सर्वत्र दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटात येणाऱ्यांची संख्या अधिक होती.

औरंगाबाद मध्य मतदारसंघात तर पूर्वी नगरसेवक असणारा एकही कार्यकर्ता आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षात नाहीत. आमदार प्रदीप जैस्वाल यांनी हा मतदारसंघ पूर्णत: बांधल्याचा दावा केला आहे. माजी महापौर, नगरसेवक सत्तेभोवती जात असले तरी ग्रामीण भागात पक्ष बांधणीत आमदार अंबादास दानवे व चंद्रकांत खैरे नव्याने प्रयत्न करताना दिसतात. अन्य विरोधी पक्षात बांधणीसाठी सुरू असणाऱ्या हालचाली दिसून येत नाहीत. त्यामुळे मराठवाड्यात विरोधी पक्षात नको रे बाबा, असे चित्र दिसून येत आहे.