शफी पठाण

साहित्य व संस्कृतीचा आणि राजकारणाचा काय संबंध असे भाबडेपणे म्हटले जात असले तरी एक सांस्कृतिक संघटनाच थेट देशाचे राजकारण नियंत्रित करत असल्याचे वास्तव आहे. या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांच्या भाषणाच्या विश्लेषणाच्या निमित्ताने अभिव्यक्ती आणि सत्ताधारी यांच्यातील शीतयुद्धाचे दर्शन घडले. त्यानिमित्ताने राजकीय विचार प्रक्रियेवर परिणाम करणाऱ्या साहित्यसारख्या राजकारणबाह्य क्षेत्रातील घडामोडींबाबत नागपूर किती ‘दक्ष’ आहे याची प्रचीती आली आहे.

काय घडले-काय बिघडले?

नागपुरात नुकताच एक परिसंवाद झाला. ‘उदगीर साहित्य संमेलन अध्यक्षीय भाषण : चिंतन आणि विश्लेषण’ असे या परिसंवादाचे गोंडस शीर्षक. ‘साहित्य समादाय भव’ वगैरे अशा उदात्त हेतूने या परिसंवादाचे आयोजन केले असून तो एक निखळ वाङ्मयीन उपक्रम आहे, असे भासवण्याचा आयोजकांनी पुरेपूर प्रयत्न केला. परंतु, आयोजक संस्था, तिला सहकार्य करणाऱ्या उपसंस्था, ‘परिश्रमपूर्वक’ निवडलेले वक्ते व त्यांच्या भाषणातून व्यक्त झालेले ‘बंच ऑफ थॉट्स’, यातून या कार्यक्रमाच्या आयोजनाचा शुद्ध राजकीय हेतू काही लपून राहू शकला नाही. सासणेंच्या अध्यक्षीय भाषणावर चिंतनाच्या ठिकाणी चिंता व विश्लेषणाच्या ठिकाणी विखार हीच या परिसंवादाची प्रमुख वैशिष्ट्ये ठरली. ती काही अगदीच अनपेक्षित नव्हती. २०१४ च्या ‘नव्या स्वातंत्र्या’नंतर जसा देशभरातील राजकारणाचा ‘अभ्यासक्रम’ बदलला तसाच तो अर्थ, साहित्य, संस्कृती आणि इतिहासाचाही बदलला. सासणेंच्या भाषणावरील या परिसंवादातही या बदलाची प्रचीती श्रोत्यांना पदोपदी आली आणि भाषणागणिक या परिसंवादामागील आयोजकांची राजकीय निकडही उलगडत गेली. बडोद्यात लक्ष्मीकांत देशमुख यांनीही ‘राजा, तू चुकतोयस…’ अशा शब्दात राजकीय नेतृत्वाला खडसावले होते. पुढे उस्मानाबादेत फादर दिब्रिटो यांनीही ‘निर्दोषांची डोकी फुटत असताना आम्ही गप्प कसे बसणार’, असा खडा सवाल विचारला. यंदा भारत सासणेंनी तर कहरच केला. ‘काळ मोठा कठीण आलाय’, असे सांगून त्यांनी ‘विदूषकाहाती सत्ता गेल्याचे’ खडे बोलही सुनावले. त्यांच्या या भाषणाला मोठ्या प्रमाणात सकारात्मक पोचपावती मिळायला लागली. नव्हे, अजूनही मिळतेच आहे. हे बघून आतापर्यंतचा सर्वांत ‘बलवान’ ‘परिवार’ हादरला.

एरवी निरुपद्रवी म्हणून गणले जाणारे हे संमेलनाध्यक्ष आपले राजकीय नुकसान करू शकतात, ही बाब लक्षात आल्यावर जणू केंद्र सरकारचे समर्थक लेखक-पत्रकार खडबडून जागे झाले. सासणेंच्या भाषणाचा प्रतिवाद हे त्याच ‘जागृती’चे लक्षण. यासाठी नागपुरात पुढाकार घेतला तो अखिल भारतीय साहित्य परिषद, विदर्भ प्रांत भारतीय विचार मंच आणि महालातील राष्ट्रीय वाचनालयाने. या सर्व संस्थांचे वैचारिक अधिष्ठान म्हणजे संघ. म्हणून मग वक्तेही संघ विचाराचेच निवडण्यात आले. ‘तरुण भारत’चे माजी संपादक सुधीर पाठक यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या परिसंवादात पहिले भाषण केले प्रा. डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी. साहित्याच्या व्यासपीठावर सासणेंनी राजकीय भाषण केले, असा त्यांचा आरोप. पण, हा आरोप करताना साहित्यिकही समाजाचा घटक असतो व समाजाच्या चांगल्या वाईट घटनांचे प्रतिबिंब त्याच्या रोजच्या जगण्यावरही उमटत असतात, हे नाईकवाडे सोयीस्कररित्या विसरले. त्यांनी सासणेंच्या भाषणाला राज्य सरकारला खूश करण्याचा प्रयत्न संबोधले. पण, आपण ज्या कार्यक्रमात हा सासणेविरोध प्रखरतेने प्रकट करत आहोत तोही राजसत्तेला खूश करण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या आदेशानेच होत आहे हे ते सोयीस्कररित्या विसरले. डॉ. कोमल ठाकरे यांच्या प्रतिमा संवर्धनात उजव्यांपेक्षा डाव्यांचे श्रेय जास्त. त्यांनी भाषणात संतुलन साधण्याचा प्रयत्न केला. पण, तो फारसा प्रभावी ठरला नाही. तिसरे वक्ते तर आवेशाच्या अश्वावर स्वार होऊनच आले होते. पत्रकार डॉ. अनंत कोळमकर असे त्यांचे नाव. त्यांच्या वैचारिक दैवताला सासणेंनी विदूषक म्हटले हे त्यांना अजिबात आवडले नाही. त्यांनी आपल्या भाषणातून याचा समाचार तर घेतलाच पण, ज्यांना सासणे विदूषक म्हणताहेत ते दोनदा बहुमताने सत्तेत आले, याचे स्मरणही करून दिले. पण लोकशाहीतील विरोधी मताच्या हक्काचे त्यांना विस्मरण झाले. या परिसंवादाचे अध्यक्ष सुधीर पाठक यांनी आधीच्या संमेलनाध्यक्षांच्या आणीबाणी विरोधाचे कौतुक केले. मात्र त्याचवेळी वर्तमानातील अघोषित आणीबाणी विरोधात बोलणाऱ्या सासणेंची मात्र निंदा केली. सासणेंच्या अद्भुतता या शब्दाचा संदर्भ देत अशी अद्भुतता छत्रपती शिवाजी महाराज व सावरकरांमध्ये होती असे सांगितले. पण, गांधी, फुले, आंबेडकरांच्या अंगभूत अद्भुततेवर त्यांनी नियोजनपूर्वक मौन बाळगले. मुळात सासणेंचे भाषण दोन भागात आहे. पहिल्या पूर्वाधात त्यांनी साहित्यावर विवेचन केले आहे तर दुसऱ्या उत्तराधात वर्तमान सामाजिक स्थितीचे वास्तव मांडले आहे. पण, या परिसंवादात सासणेंच्या साहित्यिक विवेचनावर बोलण्यात कुणालाच रस नव्हता. त्यामुळे सर्वांनी जणू ठरवून दिलेल्या ‘टूलकिट’नुसार भाषणाच्या उत्तरार्धावर भाष्य केले.

संभाव्य परिणाम

या दोन तासांच्या कार्यक्रमातून संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांच्यावरील राजकीय टीकेचा आयोजकांचा हेतू स्पष्ट होता. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या ठराविक स्वयंसेवकाकडून साहित्यिकांच्या वैचारिक विभाजनाची ‘गुरुदक्षिणा’ मिळवण्यात आयोजक शंभर टक्के यशस्वी ठरले, हे मात्र खरेच. त्याचबरोबर पुढील काळात सध्या केवळ राजकीय नेत्यांमध्ये चालणारी हमरी-तुमरी ही लेखकांच्या पातळीवरही सुरू होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.