हरियाणा राज्यातील नूह जिल्ह्यात सोमवारी (३१ जुलै) ब्रिजमंडळ जलाभिषेक यात्रेदरम्यान भडकलेल्या हिंसाचारामुळे आतापर्यंत सहा लोकांचा बळी गेला आहे. तीन वर्षांपूर्वी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने ही यात्रा हिंदू आस्थेच्या ठिकाणांना पुनरुज्जीवित करण्यासाठी सुरू करण्यात आली होती. २०११ च्या जनगणनेनुसार नूह जिल्ह्यात मुस्लिम लोकांची संख्या ७९.२ टक्के एवढी आहे.

नूह जिल्ह्याचे जुने नाव मेवात असल्याचे सांगितले जाते. येथील जुने लोक अजूनही या ठिकाणाला मेवात, असेच म्हणतात. महाभारतातील पांडव काळात येथे तीन शिवलिंगे असल्याचे सांगितले जाते. तसेच कृष्ण त्याच्या गाई चरण्यासाठी याच ठिकाणी आणत असल्याचीही कथा या भागात प्रसिद्ध आहे. विश्व हिंदू परिषदेच्या लोकांचे म्हणणे आहे की, हिंदू आस्थेसाठी महत्त्वाच्या असणार्‍या या स्थळांवर या क्षेत्रातील काही प्रभावशाली लोकांकडून अतिक्रमण होण्याचा धोका आहे.

हे वाचा >> हरियाणामध्ये हिंसाचार का भडकला? गोरक्षक मोनू मानेसरशी त्याचा काय संबंध?

विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी सांगितले की, जलाभिषेक यात्रा ही मेवात दर्शन यात्रेचाच एक भाग आहे. या यात्रेद्वारे धार्मिक स्थळांचे महत्त्व पुन्हा प्रस्थापित करण्यात येईल. शेजारच्या जिल्ह्यातील भाविकही या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले असून, त्यांनी नूह मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या ठिकाणी हिंदूंची लोकसंख्या फक्त २०.३७ टक्के एवढी आहे.

गुरगाव जिल्ह्यातील सोहना शहरातून ही यात्रा मेवातमध्ये प्रवेश करून नलहार महादेव मंदिर येथे जलाभिषेक करण्यासाठी येते. अरवली पर्वतरांगांनी घेरलेल्या नूह शहराच्या मधोमध हे एक प्राचीन मंदिर आहे. इथले लोक सांगतात की, पांडव काळापासून हे मंदिर येथे स्थित आहे. मंदिरानजीक एक तलाव असून, त्याला नलहार पांडव तलाव, असे म्हणतात. नलहार मंदिरात जलाभिषेक केल्यानंतर भाविक नूहच्या पुन्हाना तालुक्यामधील श्रांगर गावातील झिरकेश्वर महादेव आणि राधाकृष्ण मंदिरात जलाभिषेक करण्यासाठी येतात.

आणखी वाचा >> धार्मिक यात्रेतील भाविकांना शस्त्रे कुणी पुरवली? हरियाणा हिंसाचारावरून केंद्रीय राज्यमंत्र्यांनी प्रशासनाला फटकारले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोमवारी (३१ जुलै) हिंसाचार उसळल्यानंतर हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी सांगितले की, नलहर मंदिरात जवळपास तीन हजार लोकांना ओलिस ठेवले गेले होते. जलाभिषेक यात्रेमध्ये जवळपास २५ हजार लोक सहभागी झाले होते. गोरक्षक दल आणि बजरंग दलासारख्या संघटनांनीही या यात्रेमध्ये सहभाग घेतला होता. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी हरियाणा प्रशासनाला कडक कारवाईचे आदेश दिले. तसेच हिंसाचाराच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेमधील कुणीही द्वेषयुक्त भाषण करणार नाही किंवा हिंसाचारास चिथावणी देणार नाही, याची खबरदारी घेण्यास सांगितले.