scorecardresearch

अशोक चव्हाण-जयप्रकाश दांडेगावकरांची साखर पेरणी

वर्षभरावर आलेली लोकसभा निवडणूक तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम लक्षात घेता अशोक चव्हाण व जयप्रकाश दांडेगावकर यांच्या एकत्र येण्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

Ashok Chavan, Jaiprakash Dandegaonkar, Hingoli, Nanded
अशोक चव्हाण-जयप्रकाश दांडेगावकरांची साखर पेरणी

तुकाराम झाडे

हिंगोली : राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते तथा माजी मुख्यंमंत्री अशोकराव चव्हाण व राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे जयप्रकाश दांडेगावकर हे प्रदीर्घकाळ राजकारणात असून कधीही एकत्र न आलेले. नांदेड-हिंगोलीतील दिग्गज नेते प्रथमच एका व्यासपीठावर दिसले. त्यामुळे नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील राजकीय चर्चेला नवी समीकरणाचे धुमारे फुटले आहेत. वर्षभरावर आलेली लोकसभा निवडणूक तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम लक्षात घेता अशोक चव्हाण व जयप्रकाश दांडेगावकर यांच्या एकत्र येण्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

राजकारणासोबतच साखर उद्योगातील मोठे नेते म्हणूनही हिंगोली-नांदेड जिल्ह्यात परिचित असलेले दोन्ही नेते वसमत तालुक्यातील पूर्णा साखर कारखान्यातील विस्तारीत इथेनॉल प्रकल्पाच्या उदघाटन प्रसंगी एकत्र आले होते. हिंगोलीत मधल्याकाळा मध्ये भाजपच्या दिग्गज नेत्यांचे दौरे पार पडले. त्यात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्य मंत्री डॉ.भागवत कराड, भूपेंद्र यादव,शंतनू ठाकूर, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आदींचे दौरे झाले. या सर्व नेत्यांनी भाजपसाठी लोकसभेची चाचपणी केली. भाजपचा विस्तार संदेश पाहता शिंदे गटासह महाविकास आघाडीमध्येही खळबळ सुरू झाली होती. राज्यातील ४८ जागांवर लढण्याची तयारी असल्याची भाषा सुरू झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजपचेआव्हान रोखण्यासाठी महाविकास आघाडीचे नेतेही एकत्र येऊन ताकद दाखवण्याच्या दृष्टीने जुळवाजुळव करतआहेत.

हेही वाचा… बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांच्या पक्षांतराची परंपरा सुरूच

पूर्णा साखर कारखान्यावरील इथेनॉल प्रकल्पाच्या कार्यक्रमातून दोन्ही नेत्यांचे एकत्र येणे आगामी लोकसभेच्या निवडणुकीची ही साखर पेरणी असल्याचे सांगण्यात येत आहे. छत्रपती संभाजी नगर येथील नियोजित महाविकास आघाडीच्या सभेसाठी हिंगोलीत महाविकास आघाडीच्या पदाधिका ऱ्यांनी २३ मार्च रोजी एक बैठक घेतली.बैठकीतील पदाधिकारी,कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षात घेता भाजपविरोधात सारे एकवटतील असे चित्र दिसून येत आहे.

हेही वाचा… काँग्रेसनिष्ठा खुंटीला टांगून धर्मण्णा सादूल भारत राष्ट्र समितीत

हिंगोलीत माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर व विधान परिषद सदस्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यातील गटबाजी जवळपास संपुष्टात आली आहे. काँग्रेसमधील गटांपैकी वसमत येथील एक गट अशोक चव्हाणांचाही आहे. दिवंगत काँग्रेसचे नेते राजीव सातव हयात असताना चव्हाण यांनी जिल्ह्याच्या राजकारणात फारसे लक्ष घातलेले नसले तरी त्यांना मानणारा जिल्ह्यात एक गट कायम आहे.त्यांची तीच ताकद लक्षात घेऊन आणि नांदेड मधीलही मजबूत पकड पाहता येत्या काळात होणार्‍या सर्वच संस्थात्मक निवडणुकीत चव्हाण यांची मदत राष्ट्रवादीसाठी बेरजेचे राजकारण ठरेल हे ओळखून त्यांना खास पूर्णा साखर कारखान्याच्या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आले होते.राज्याचे महसूल,सांस्कृतिक,राजशिष्ठाचारमंत्री ते मुख्यमंत्रीपद व अलिकडच्या महाविकास आघाडीच्या काळात सार्वजनिक बांधकाम सारखे महत्वाचे खाते सांभाळत असतानाही अशोक चव्हाण हे जिल्ह्यात फिरकले नव्हते. परंतु आता त्यांना निमंत्रित करण्यामागे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांसह प्रमुख निवडणुकी तील बेरजेचे गणित असल्याची चर्चा आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 12:45 IST

संबंधित बातम्या