मुंबई : स्वबळावर लोकसभा निवडणूक लढविण्याचे प्रयत्न फसल्याने आणि महायुतीकडून लोकसभेसाठी एकही जागा मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर सध्याच्या राजकीय परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापुढे पर्यायच शिल्लक राहिला नव्हता. त्यामुळे मोदींना पाठिंबा ही भाजपची राजकीय गरज नसून मनसेची अधिक होती, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढविण्यासाठी तयारी सुरु केली होती. मनसेची काही प्रमाणात ताकद असलेल्या मुंबई, पुणे, नाशिक अशा काही भागातील मतदारसंघांचा आढावा घेऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चाही करण्यात आली. काही मतदारसंघात सर्वेक्षण करण्यात आले होते. पुण्यातून लढण्यासाठी वसंत मोरे इच्छुक होते आणि अमित ठाकरेही निवडणूक लढविणार, अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष ॲड. आशिष शेलार व अन्य नेत्यांनी राज ठाकरे यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर मनसे महायुतीमध्ये सहभागी होण्याच्या चर्चा सुरु झाल्या. ठाकरे यांनी नवी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यावर तर मनसेला दक्षिण मुंबईसह एक-दोन जागा मिळणार, असे दावेही सुरु झाले. ठाकरे यांना महायुतीत सामील करुन घेतल्यावर ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचेही नेतृत्व करणार असल्याच्या वावड्या सुरु झाल्या.

हेही वाचा : भाजपाच्या ‘या’ नेत्यावर तृणमूल नेत्यांविरुद्ध कट रचल्याचा आरोप

मात्र भाजपने मनसेच्या चिन्हावर लोकसभेसाठी एकही जागा देता येणार नाही. पण या निवडणुकीत सहकार्य व पाठिंबा दिल्यास विधानसभेसाठी काही जागांवर विचार करता येईल, एवढेच आश्वासन मनसेला दिले आहे, असे वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. सध्याच्या परिस्थितीत मनसेला स्वब‌ळावर लढण्यासाठी उमेदवारच नाहीत. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना सहभागी असून काँग्रेस किंवा राहुल गांधी यांना पाठिंबा देता येणे शक्य नाही. त्यामुळे मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देण्याशिवाय राज ठाकरे यांच्यापुढे अन्य पर्याय शिल्लक राहिलेला नव्हता, असे सूत्रांनी नमूद केले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Political need of mns chief raj thackeray to support narendra modi for lok sabha polls print politics news css
First published on: 10-04-2024 at 18:59 IST