नागपूर : विधानसभा असो किंवा बाहेर विरोधकांना ‘ठोकून’ काढा या सत्ताधारी पक्षाच्या धोरणाचा प्रत्यय विधिमंडळाच्या पावसाळी अधिविवेशनादरम्यान विधानभवन परिसरातील हाणामारीच्या घटनेने आला. या घटनेला राजकीय वैरभावनेची किनार असल्याने असे प्रसंग वारंवार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषत : आगामी महापालिकेच्या निवडणुकीत याची भीती अधिक असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गाजले ते शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराने कॅन्टीन कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीमुळे आणि अधिवेशन संपण्याच्या एकदिवस आधी विधान भवन परिसरात सत्ताधारी पक्षाच्या आमदार समर्थकाने विरोधी पक्षाच्या आमदार समर्थकाला केलेल्या मारहाणी मुळे. या दोन्ही घटनांमध्ये आम्ही सत्ताधारी आहोत,आमचे कोणीच काही बघडवू शकत नाही, असे मारहाण करणाऱ्याच्या देहबोलीतून स्पष्टपणे दिसून येत होते. या घटनांची सभागृहात आणि बाहेर खुप चर्चा झाली. मात्र हे प्रथमच घडले असे नव्हे. ऐरवी राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक यांच्या समर्थकांमध्ये वाद होण्याचे अनेक प्रसंग घडले.

२०१४ नंतर तर विरोधकांना ठरवून लक्ष्य करण्याचे प्रकार वाढल्याने, वाचाळ पुढाऱ्यांना सत्ताधारी पक्षाकडून आवर न घातला गेल्याने असे प्रकार करणाऱ्यांची हिंमत वाढत गेली. त्याची परिणीती मुंबई विधान भवन परिसरात घडलेली घटना होय, असे स्थानिक पात‌ळीर बोलले जाते. विरोधकांना धडा शिकवणे हा संदेश देण्याचा प्रयत्न अशा घटनांच्या माध्यमातून जाणीवपूर्क केला जातो, असा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे. ही सुरूवात आहे,पुढे महापालिका निवडणुका आहेत. त्यात नागपूरची निवडणूक भाजपसाठी मुंबई महापालिके इतकीच प्रतिष्ठेची आहे.

काहीही करा ,पण निवडणुका जिंका हेच धोरण सत्ताधाऱ्यांचे आहे व ते त्यांनी जाहीरपणे बोलूनही दाखवले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत राजकीय संघर्ष अटळ आहे व तसे झाल्यास विधान भवन परिसरातील हाणामारी सारखे प्रसंग नागपूरमध्ये प्रभागा-प्रभागात घडतांना दिसतील, अशी भीती आता व्यक्त केली जात आहे. ‘आपली सत्ता आहे, गृहखातेही आपलेच आहे’ असे काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री सावनेरमध्ये बोलून गेले. त्यामुळे महापालिका निवडणुका कशा पद्धतीने लढल्या जातील याचे संकेत यातून मिळते.

निवडणुकांमध्ये राडा नागपूरला नवीन नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे कार्यकर्ते काँग्रेसच्या माजी खासदाराच्या निवासस्थानी चालून गेले होते. विधानसभा निवडणुकीत मध्य नागपूरमध्ये राडा झाला होता. मार्चमध्ये दंगल झाली होती. या सर्व प्रकरणात पोलिसांवर पक्षपात करण्याचा आरोप झाला होता. ही पाश्वभूमी लक्षात घेतली तर महापालिका निवडणुकांमध्ये या घटनांची पुनरावृत्ती घडणार नाही, याची खात्री कोणी देऊ शकत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लढत अटीतटीची

एका प्रभागात अनेक उमेदवार परस्परांविरुद्ध रिणांगणात असतात, लढत अटीतटीची असते, सत्ताधारी विरुद्द विरोधक हा संघर्ष अटळ असतो. प्रत्येक ठिकाणी पोलीस संरक्षण दिले जाऊ शकत नाही. मुंबईत विधानभवन परिसरात जर सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या देखत हाणामारीची घटना घडू शकते तर महापालिका निवडणुका त्यालाअपवाद ठरू शकत नाही. याबाबत भाजप नेते म्हणतात महापालिकेच्या निवडणुका अद्याप जाहीरच झाल्या नाही, त्याची पूर्व तयारी सध्या सुरू आहे. त्यामुळे मुंबईतील घटनेचा तर्क येथे लावणे सर्वार्थाने चुकीचे ठरते. शहर काँग्रेसचे प्रवक्ते अभिजीत झा यांनी मात्र सरकारी यंत्रणेचा वापर नेहमीच सत्ताधारी निवडणुकीत करीत असल्याचे यापूर्वी दिसून आल्याचा दावा केला.