नागपूर : अतिवृष्टी, पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असे ऐक नव्हे तर अनेक आश्वासने राज्याच्या महसूल मंत्र्यांपासून सत्ताधारी पक्षातील अन्य मंत्री देत होते. शेतकऱ्यांप्रती कळवळा व्यक्त करीत होते. पण दिवाळी जवळ आली तरी तरीशेतकऱ्यांच्या हाती प्रत्यक्षात किती रक्कम मिळणार हे स्पष्ट होत नव्हते, केद्रीय मंत्री रामदास आठवलें यांनी त्यांच्या नागपूर दौऱ्यात याबाबत केलेल्या सत्यकथनाने सरकारचे शेतकऱ्यांविषयीचे प्रेम किती बेगडी आहे हे स्पष्ट झाले.

नागपूरविभागात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासनाकडून ५०० कोटींची मागणी केली, त्यांच्या पदरी पडले ते ३७ कोटी. विभागातील सहा जिल्ह्यात झालेल्या तीन लाख हेक्टरवरील पीक हानीच्या तुलनेत ही मदत अत्यंत तुटपुंजी ठरते.

रिपाइं नेते , केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांचा नुकताच नागपूर दौरा पार पडला. त्यांनी त्यांच्याखात्याशी संबंधित विभागांसह महसूल खात्याचाही आढावा घेतला व त्याची माहिती पत्रकार परिषदेत आकडेवारीसह दिली. तसे आठवले केंद्रात मंत्री असले तरी त्यांना नागपुरात कोणी गांभीर्याने घेत नाही. भाजपतर नाहीच नाही. त्यामुळे ते कधी नागपूरला येतात आणि जातात याची माहितीही अनेकदा स्थानिक भाजप नेत्यांना नसते. यावेळी मात्र आठवले यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत पत्रकारांशी संवाद साधला. पण आढावा बैठकीची माहितीही दिली. अतिवृष्टीबाधितांना सरकारकडून मिळणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मदतीचा तपशीलही होता.

आठवले यांनी सांगितल्या नुसार नागपूर विभगात ३ लाख ३४ हजार हेक्टर शेतजमिनीवरील पीक हानी झाली. नुकसान भरपाई पोटी विभागीय आयुक्तांनी पाचशे कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला. त्यापैकी फक्त ३७ कोटी रुपये राज्य सरकारने पहिला हप्ता म्हणून पाठवले. नागपूर विभागात सहा जिल्हे येतात. सर्व जिल्ह्यांना समान वाटप करायचे म्हंटले तरी प्रत्येक जिल्ह्याला सहा कोटी रुपये येतात. एकट्या नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टी बाधित शेती ८० हजार हेक्टर आहे. बाधित क्षेत्र आणि मदतीची रक्कम यांचे व्यस्त प्रमाण लक्षात घेतले तर मदतीच्या नावाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा हा प्रकार आहे, अशी टीका आता विरोधी पक्षाकडून केली जात आहे.

नुसते शब्दांचे बुडबुडे

जुलैपासून ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नागपूर विभागासह राज्याच्या सर्वच भागात अतिवृष्टी, नद्यांना आलेला पूर, त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. ऐन दिवाळीच्या पूर्वी हातातोंडाशी आलेले पीक गेल्याने शेतकऱ्यांच्या आयुष्यात आंधार निर्माण झाला. खरे तर शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज होती. पण सरकारचे प्रतिनिधी म्हणजे मंत्री केवळ तोंडी आश्वासनच देत राहिले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूर जिल्ह्याचे. ते नागपूरमध्ये असताना दररोज शेतकऱ्यांप्रती कळवळा व्यक्त करीत असे. तत्काळ पंचनामे केले जातील. अहवाल तयार होईल, शेतकऱ्यांना मदत मिळेल, असे सांगत होते. निकषापेक्षा अधिक मदत केली जाईल, असे म्हणत होते. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असा दावा करीत होते. पण प्रत्यक्षात मदत किती मिळेल हे सांगत नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याचे औचित्य साधून मुख्यमत्र्यांनी पॅकेज जाहीर केले. पण त्याचे पैसे अजूनही मिळणे सुरू झाले नाही. आठवले यांनी पत्रकार परिषदेत आकडेच सांगून भाजपचे शेतकरी प्रेम किती बेगडी आहे हे स्पष्ट केले.